चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे : खराडीतील एसबीआयच्या एटीएममधून चोरट्यांनी मध्यरात्रीच्या वेळी 21 लाखांची रक्कम चोरी केल्याची घटना घडली. याबाबत, चंदननगर पोलीस ठाण्यात इराप्पा चंदप्पा मेलकेरी (वय 30, रा. ससाणेनगर) या एसबीआयच्या कंत्राटदाराने फिर्याद दिली आहे.
खराडीरोडवरील पंचरत्न अपार्टमेंटमधील स्टेट बँक ऑफ इंडियाचे हे एटीएम मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी फोडले. चोरट्यांनी एटीएम मशिनचा दरवाजा गॅस कटरच्या सहाय्याने कापला. त्यामुळे 200 रुपयांच्या काही नोटा जळाल्या. त्या जळालेल्या नोटा चोरट्यांनी तिथेच टाकल्या. या एटीएममधील 21 लाख 49,500 रुपयांची रक्कम चोरून चोरट्यांनी पलायन केले. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक एस. पी. भोसले करीत आहेत.