यावल शहरातील घटना ; प्रवाशांच्या गर्दीत अचानक उघडले फाटक
यावल- यावलहुन भुसावळकडे जाणार्या चालत्या एसटी बसचे अचानक फाटक उघडून एक प्रवाशी रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाला व उपचारा दरम्यान त्यांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री पाऊने नऊ वाजता घडली. या घटनेत बंटी गुलाबचंद डोलतानी (रा.सिधी कॉलनी, भुसावळ) यांचा मृत्यू झाला.
अचानक उघडले फाटक
यावल आगारातुन यावल-भुसावळ बस क्रमांक (एम.एच.20 बी.एल.) ही बस यावलहून रविवारी रात्री 8.40 वाजेला निघाली असता या बसमध्ये फालक नगर थांब्यावरून बंटी गुलाबचंद डोलतानी (रा. सिधी कॉलनी, भुसावळ) हे भुसावळ जाण्यासाठी बसले. बसमध्ये खुपचं गर्दी असल्याने तो बसच्या दरवाज्या जवळचं उभा होता. दरम्यान तेथुन बस पुढे निघाली असता बीएसएनएल कार्यालयाच्या पुढील वळणावर अचानक बसचा दरवाजा उघडून बंटी हा थेट रस्त्यावर कोसळला. त्याच्या डोक्याला जबर दुखापत होत पायाला ही दुखापत होवुन तो घटनास्थळीचं रक्ताच्या थारोळ्यात बेशुध्द झाला. काही नागरीकांनी त्यास तत्काळ यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. डॉ. वसीम शेख, निलीमा पाटील, गुलाम अहेमद यांनी प्रथमोपचार केले. तर बंटी डोलतानी हा गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळताच डॉ कुंदन फेगडे, भुषण फेगडे, रीतेश बारी, स्नेहल फिरके, अरूण कोळंबे आदींनी रूग्णालय गाठले व त्यास तत्काळ जळगाव येेथील पुढील उपचार्थ हलवण्यात आले मात्र रस्त्यातचं त्याची प्राणज्योत मालावली.
फेगडे कुटुंबीय रूग्णालयात
मयत बंटी हा कुटुंबातील एकमेव कमावत होता. त्याच्या पश्चात म्हातारी आई, पत्नी, दोन लहान मुली असा परीवार आहे. बंटी डोलतानी हा शहरातील डॉ. जागृती फेगडे व डॉ. कुंदन फेगडे यांच्या श्री कलेक्शन मध्ये कामास होता. बंटी जखमी झाल्याचे कळताच फेगडे कुटुंबीय रूग्णालयात दाखल झालेे व स्वत: हा उपचारा करीता पुढाकार घेत जळगाव सोबत रवाना झाले मात्र रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली.