उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील येणेगूर (ता. उमरगा) टोल नाक्यानजीक कर्नाटक व महाराष्ट्र एस. टी. बसमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत अपघातात दोन्ही बसचे चालक आणि तीन प्रवासी असे पाच जण ठार झाले. या भीषण अपघातात २० जण जखमी झाले आहेत. यापैकी ८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. शुक्रवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. घटनास्थळी पोलिसांनी दाखल होत वाहतूक सुरळीत केली. जखमींना येणेगूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र परिवहन महामंडळाची (इंदापूर डेपो) उमरगा -पुणे बस (क्र एम. एच. १४, बी. टी. ३२५४) उमरगाहून पुण्याकडे निघाली होती. तर कर्नाटक महामंडळाची बस (क्र के. ए. २८ एफ -१६०३) तुळजापूरहून आळंदकडे जात होती. या दरम्यान येनेगुर टोलनाक्यानजीक निजगून स्वामी यांच्या शेताजवळ दोन्ही बसची समोरासमोर धडक झाली. यामध्ये उमरगा बसमधील तीन प्रवासी व चालक तर कर्नाटक बस चालकाचा मृत्यू झाला. मृतांमध्ये प्रवासी शिवाजी साळुंके, वामन साळुंखे (रा. उमरगा), लक्ष्मण म्हेत्रे, महाराष्ट्र परिवहन मंडळाचा चालक गोरख चांदगुंडे आणि कर्नाटक परिवहन मंडळाचा चालक आंबना तेलिकुणे यांचा समावेश आहे.