ऐक्याचे प्रतीक असलेल्या गणेशोत्सवाची उभारणी श्रमजीवींच्या हाताने : डॉ. देखणे

0

पुणे । उत्सवांच्या माध्यमातून समाजामध्ये भावनिक नाते निर्माण होते. उत्सव हे ऐक्याचे साधन आणि भावनांचे संवर्धन आहे. गणेशोत्सवात अनेक लोक काम करतात. परंतु खर्‍या अर्थाने श्रमजीवींच्या हातानेच उत्सव उभा राहतो. त्यामुळे त्यांच्याप्रती कृृतज्ञता व्यक्त करून त्यांना वंदन करायला हवे, असे प्रतिपादन संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी केले. गणेशोत्सवादरम्यान पुणे शहर स्वच्छ ठेवणार्‍या स्वच्छता कर्मचार्‍यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अखिल मंडई मंडळातर्फे सोमवारी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

एकपात्री कलाकार रंगभूमीचे शिलेदार
एकपात्री कलाकार हे महाराष्ट्राच्या रंगभूमीचे शिलेदार आहेत. सामाजिक जाणीवा निर्माण करण्याचे काम कलाकार आपल्या कलेतून करीत असतात. त्यांच्या माध्यमातूनच प्रबोधनाचे पर्व निर्माण होत आहे, असे डॉ. देखणे यांनी यावेळी सांगितले. मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, मिलींद खांदोडे, आनंद सराफ, देविदास बहिरट, विश्वास भोर, संजय यादव, विकी खन्ना, हरीश मोरे, सुरज थोरात, किशोर आदमणे उपस्थित होते. गणेशोत्सवादरम्यान सेवा देणार्‍या एकपात्री कलाकारांचा सन्मान करण्यात आला.

मंडाळाचे कार्यकर्ते पुण्याची ताकद
गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते हे पुण्याची ताकद आहेत. त्यांना संघटीत करून चांगल्या कामासाठी त्यांचा उपयोग करून घ्यायला हवा. अखिल मंडई मंडळातर्फे मागील 22 वर्षांपासून गणेशोत्सवात स्वच्छता करणार्‍या कर्मचार्‍यांचा सन्मान करण्यात येतो. याचेच अनुकरण करीत पुण्यातील तसेच पुण्याबाहेरील गणेशोत्सव मंडळे देखील या कर्मचार्‍यांकरीता सन्मान सोहळ्याचे आयोजन करीत आहेत, असे थोरात यांनी सांगितले. थोरात यांनी प्रास्ताविक तर आनंद सराफ यांनी सूत्रसंचालन केले.