पुणे । शासनाच्या वतीने क दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेल्या येरवडा येथील पर्णकुटी चौकातील ऐतिहासिक पांडवकालीन तारकेश्वर मंदिराच्या सुमारे 40 लाख रुपये अंदाजित खर्चाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार जगदीश मुळीक यांच्या हस्ते करण्यात आले. ऐतिहासिक तारकेश्वर मंदिराच्या वैभवात भर घालणार असल्याचे यावेळी मुळीक यांनी सांगितले.
सध्या उपलब्ध निधीतून पहिल्या टप्प्यांतर्गत येरवडा येथील पर्णकुटी चौकातील रस्त्यापासून तारकेश्वर मंदिरापर्यंत जाणार्या पायर्यांची दुरुस्ती व परिस्थितीची सुधारणा या निधीतून केली जाणार आहे. त्यामध्ये जुन्या पायर्या काढणे, नवीन दगडी पायर्या तयार करणे, पायर्यांचे नूतनीकरण व सुशोभीकरण, मंदिराकडे जाणार्या मार्गावर मुख्य प्रवेशद्वार, गॅबियन वॉल बसविणे, नवीन लोखंडी रेलिंग करणे, संरक्षण भिंतींची दुरुस्ती करणे, राडारोडा उचलणे, बांधकाम साहित्याच्या चाचण्या घेणे आणि वृक्षारोपण अशी विविध विकासमागे या निधीतून होणार आहेत.
तारकेश्वर मंदिर आगामी काळात सांस्कृतिक, धार्मिक आणि पारंपरिकदृष्ट्या जगाच्या नकाशावर यावे यासाठी निधी कमी पडू दिली जाणार नाही. तसेच तारकेश्वर मंदिर परिसराच्या सर्वांगिण विकासासाठी आगामी काळात सुमारे 3 कोटी 20 लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याचेही आ. मुळीक यावेळी सांगितलेे. याप्रसंगी निलेश जठार, उमाकांत अनभुले, विकास सोनवणे, गणेश ढोकले, कुंतीलाल चोरडीया, बाबू शेठ वैष्णव, ज्ञानेश्वर बाबर, विजय पांडव, नामदेवराव चावट, संजय शिर्के, गणेश देवकर, नाना पाटोळे, संगीता राजगुरू, शिल्पा राजगुरू, कविता पांडव, अनिता राजगुरू, कल्पना राजगुरू, मंगल राजगुरू, शरदचंद्र कर्नावट, शैलेश हिरणवार आदी उपस्थित होते. येरवडा भागातील ऐतिहासिक तीर्थक्षेत्र असलेल्या तारकेश्वर मंदिर टेकडीच्या विकासासाठी आ. मुळीक यांनी गेल्या दोन वर्षांपासून विविध स्तरावर पाठपुरावा करून क वर्ग तीर्थक्षेत्र घोषित करून घेतले. विविध विकास कामाअंतर्गत तारकेश्वर मंदिर टेकडीच्या परिसरात सभागृह, अभ्यासिका, वाचनालय, व्यायामशाळा, कुस्त्यांचा आखाडा, अशा सुविधा केल्या जाणार आहेत. विविध सुधारणा आणि विकास कामे होणार असल्यामुळे येरवडा परिसरातील नागरिकांना आणि भाविकांना यांचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.