प्रशासनाला आली जाग ; महिनाभरात सर्व समस्या सोडवण्याची लेखी ग्वाही
रावेर- तालुक्यातील ऐनपूर गावातील पुनर्वसनाची प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करावीत, सुवर्ण महोत्सव योजनेची शिष्यवृत्ती मुलांच्या खात्यावर जमा करावी, लोंबकळत असलेल्या वीज तारांची दुरुस्ती करून सुरक्षा कवच बसवावे यासह विविध मागण्यांसाठी पुनर्वसन संघर्ष समितीचे अध्यक्ष नितीन जैतकर यांनी नवीन पाण्याच्या उंच टाकीवर चढून घोषणाबाजी करीत मंगळवारी शोले स्टाईल आंदोलन केल्याने लाल फितीच्या अधिकार्यांमध्ये मोठी खळबळ उडाली. वारंवार विनंती करूनदेखील पुर्नवसनाची कामे होत नसल्याने आंदोलन होत असल्याची कळताच अधिकार्यांनी धाव घेत आंदोलकांची समजूत घालून त्यांच्या मागण्या तातडीने पूर्ण करण्याची लेखी ग्वाही दिल्यानंतर आंदोलक जलकुंभाखाली उतरले.
लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे
शोले स्टाईल आंदोलकांना भुसावळ येथील पुनर्वसन विभागाचे उपविभागीय अधिकारी भुजबळ यांनी एक महिन्यांच्या आत मंजूर सर्व कामे करण्याचे लेखी आश्वासन दिले. रावेरचे गटशिक्षण अधिकारी विजय पवार यांनी शिष्यवृत्ती संदर्भात तर विद्युत वितरण कंपनीचे शाखा अभियंता अजय शर्मा यांनीदेखील विजेसंदर्भात लेखी आश्वासन दिले.
यांची होती उपस्थिती
यावेळी आंदोलनात पुनर्वसन संघर्ष समितीचे अध्यक्ष नितीन जैतकर, उपसरपंच श्रीराम महाजन, ग्रामपंचायत सदस्य युसूफ मौलाना, कृष्णा जैतकर, सुभाष जैतकर, ज्ञानेश्वर महाजन, रवींद्र कुंभार, रंजना जैतकर, छाया जैतकर, विनोद भील, पंकज कोळी आदी उपस्थित होते. यावेळी निंभोरा पोलिसांनी बंदोबस्त ठेवला.