ऐन उन्हाळ्यात वन्यतिवांची पाण्यासाठी भटकंती थांबणार

0

यवत । पांढरेवाडी येथील वन क्षेत्रातील पाणवठा युथ फाउंडेशनच्या वतीने टँकरद्वारे पाण्याने भरून देण्यात आला.त्यामुळे या भागातील वन्य प्राण्यांची ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी होणारी भटकंती थांबणार असुन यामुळे वन्य प्राण्यांना दिलासा मिळाला आहे. पाण्यासाठी वन्यजीवांच्या घशाची कोरड मीटविण्यासाठी युथ फाऊंडेशनने पुढाकार घेतल्याने सर्वस्थारातुन त्यांचे कौतुक होत आहे.

कुरकुंभ, पांढरेवाडी, जिरेगाव, रोटी या भागात मोठया प्रमाणात वनविभाग असून या वनविभागात हरीण, काळवीट, ससे, कोल्हे, लांडगे आदींसह पक्षांची संख्या मोठी आहे. वनविभागात असलेले पाणवठे कोरडे पडल्याने या वन्य प्राण्यांची व पक्षांची पाण्यावाचून हाल होत होते. तर हे वन्य प्राणी पाण्याच्या शोधात लोकवस्तीकडे धाव घेत होते. लोकवस्तीकडे गेल्यामुळे अनेक वेळा कुत्र्यांच्याकडून या प्राण्यांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

12 हजार लीटर पाणी सोडले
या वन्य जीवांचे होणारे हाल पाहून दौंड शहरातील यूथ फाउंडेशनच्या वतीने पांढरेवाडी येथील कोरडे पडलेले पाणवठे टँकरच्या साह्याने भरून देण्यात आले. यावेळी वनरक्षक शीतल मेरग वन कर्मचारी जालिंदर झगडे,तुकाराम देशमाने अखिल खान उपस्थित होते. युथ फाउंडेशनचे निसार सय्यद व योगेश चापोरकर यांनी पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिल्याने या पाणवठ्यांमध्ये एकूण 12 हजार लिटर पाणी सोडण्यात आले.