ऐन दिवाळीच्या तोंडावर बस आगार ओसाड

0

पुरेसे प्रवासी नसल्याने दहा फेर्‍या रद्द

पिंपरी चिंचवड : काहीच दिवसांवर दिवाळी सण येवून ठेपला असताना पिंपरी-चिंचवड येथील राज्य परिवहन (एस. टी.) महामंडळाचे वल्लभनगरात प्रवाशी नसल्याने आगार ओस पडले आहे. सततची इंधन दर वाढ व कर्मचार्‍यांचा वाढता खर्च यामुळे आगाराच्या महसूलाची आवक पेक्षा खर्च जास्त होत आहे. त्यातच पुरेसे प्रवासी नसल्याने दहा गाड्यांच्या फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत.

प्रवाशांचा प्रतिसाद पाहून बसेस सुरु…

वल्लभनगर आगारात शिवशाहीसह 54 बस आहेत. त्यापैकी 36 बस रोज आपल्या मार्गावर धावतात. आता त्यापैकी 10 बस फेर्‍या रद्द करण्यात आल्याने केवळ फक्त 26 बसेस मार्गावर धावत आहेत. या बस 31 ऑक्टोबर पर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती आगार प्रशासनाकडून मिळाली आहे. मराठी प्राथमिक, माध्यमिक शाळेला 29 ऑक्टोबर तर सी. बी. एस. सी शाळांना 3 नोव्हेंबरला सुट्टी लागत असल्याने प्रवाशांचा प्रतिसाद पाहून बसेस सुरु करण्यात येतील अशी माहिती आगार प्रशासनाकडून देण्यात आली.

बंद केलेल्या गाड्या
पंढरपूर 5 गाड्यापैकी 3 गाड्या, नाशिक 3 पैकी 2 गाड्या, उमरगा, वांगी, गोंदावले, तर बोरीवलीच्या दोन्ही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

प्रवाशांची संख्या कमी झाली असल्याने गाड्यांना फेर्‍या मारायला परवडत नाहीत. परिणामी या गाड्या 31 ऑक्टोबरपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र प्रवाशांचा प्रतिसाद बघून बंद केलेल्या फेर्‍या 31 ऑक्टोबरपूर्वी सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. पल्लवी पाटील, सहाय्यक वाहतूक अधिक्षक, वल्लभनगर आगार.