ऑगस्टमध्येच उघडावे लागतील कोयनाचे दरवाजे!

0

मुंबई । मागील दोन दिवसांपासून कोयना धरण परिसरात पावसाची जोरदार बॅटींग सुरू आहे. गेल्या 24 तासांत धरणाची पाण्याची पातळी 4 टीएमसीने वाढली आहे. त्यामुळे जुलै महिन्यांच्या तिसर्‍या आठवड्यात कोयना धरणाची एकूण पाण्याची पातळी आता 50 टक्क्यांहून अधिक पातळी वाढली आहे. यंदा राज्यात मान्सूनचे आगमन उशिरा झाले. त्यामुळे जुलैच्या दुसर्‍या आठवड्यापासून राज्यात पावसाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. विदर्भ, मराठवाडा येथे जरी पावसाने अद्याप दमदार हजेरी लावली नसलील तरी कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाने चांगलाच जम बसवला आहे. त्यामुळेच कोयना धरणक्षेत्र अर्ध्याहून अधिक भरले आहे. अजूनही पावसाचे अनेक नक्षत्र बाकी आहेत. त्यावेळी होणार्‍या मुसळधार पर्जन्यवृष्टीने कोयना धरण ऑगस्ट महिन्यांच्या पहिल्याच आठवड्यात संपूर्ण भरेल, तेव्हा मात्र कोयना धरणातील पाण्याचा विसर्ग करणे अनिवार्य ठरणार आहे. ऑगस्ट महिन्यांत कोयनाची दरवाजे उघडण्याची वेळ आल्यास ही यंदाच्या मान्सूनमधील विशेष बाब ठरणार आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठ्यात जलदगतीने वाढ
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यांत दमदार पाऊस सुरू असून, गेल्या 24 तासांत कोयना धरणातील पाणीसाठ्यात 4 टीएमसीने वाढ झाली आहे. त्यामुळे धरणात आता 52.36 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. यापैकी उपयुक्त साठा 47.36 टीएमसी, पाणीउंची 2109. 11 फूट, जलपातळी 643.103 मीटर इतकी झाली आहे. एक जूनपासून आतापर्यंत या धरणात 36.54 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे.

मुंबईची धरणेही भरून वाहत आहेत
मुंबईला मोडकसागर, तानसा, भातसा, विहार, तुळशी, मध्य वैतरणा व अप्पर वैतरणा या सात धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. या धरणांची पाणी साठवणूक क्षमता ही एकूण 1 लाख 44 हजार कोटी लिटर एवढी असून त्या तुलनेत 18 जुलैपर्यंत 1 लाख 02 हजार 842 कोटी लिटर एवढा पाणीसाठा जमा झाला आहे.

पुण्यातील धरणांच्या पाणीपातळीतही वाढ
पुणे जिल्ह्यातील 19 धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे उजनीत बंडगार्डन व दौंड येथून पाण्याचा विसर्ग येण्यास सुरुवात झाल्याने उजनी धरणात गेल्या चार दिवसात जवळपास 11 टक्के पाणीसाठा वाढला आहे़ सध्या उजनी धरणाची पाणीपताळी 490.640 मी़ इतकी आहे. एकूण पाणीसाठा 1727़19 दलघमी आहे. दौंड येथून 13586 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग तर बंडगार्डन येथून पाण्याचा विसर्ज 19720 क्युसेक्स इतका होतोय.

छोटी-मोठी धरणेही भरून वाहताहेत
कराड तालुक्याच्या पश्चिम, दक्षिणेकडील उंडाळे, सवादे, येणपे विभागासह मणदुरे विभागातील साखरी-चिटेघर धरणही पूर्ण क्षमतेने भरले असून, सांडव्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने केरा व कोयना नदी तर कराडपासून पुढे कृष्णा नदी पात्रातील पाण्यात मोठी वाढ झाली आहे. मोरणा विभागातील मोरणा-गुरेघर धरणाच्या सांडव्यातूनही पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला आहे. तारळी, उत्तरमांड धरणातही पुरेशा प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. तसेच ढेबेवाडी (सणबूर) येथील महिंद धरणाच्या मुख्य भिंतीवरून पाण्याचा वेगाने प्रवाह सुरू झाला आहे. एकंदरीत या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे राज्यातील बहुतांश छोटी-मोठी धरणे आता भरून वाहू लागली आहेत.