ऑटोनगरात तरूणाला तिघांकडून मारहाण

0

जळगाव । आपसात भांडण लावत असल्याच्या संशयावरुन उमर खान हयाद खान पठाण (वय 33 रा.जुम्मा शहा वखार जवळ, तांबापुरा, जळगाव) या तरुणाला चांद मुसा पटेल, अशरफ शफी पटेल व माजी नगरसेवक इबा मुसा पटेल या तिघांनी गोडावूनवर लोखंडी पाईप व सळईने बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री पावणेबारा वाजता ऑटोनगरात घडली. याप्रकरणी इबा पटेलसह तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, उमर खान हा तरुण इबा पटेल याच्या गोडाऊनवर कामाला आहे. आपसात भांडण लावत असल्याच्या संशयावरुन वादाची ठिणगी पडली.

चांद मुसा पटेल व अशरफ पटेल या दोघ जण शनिवारी रात्री 9 वाजता त्याच्या घरी गेले. घरात घुसून त्याला बाहेर काढले व इबा पटेल यांच्या बुलेटवर बसवून ऑटो नगरातील गोडाऊनवर आणले. तेथे इबा पटेल बसलेले होते. या तिघांनी त्याला भांडण का लावतो यावरुन जाब विचारत लोखंडी सळई, पाईपाने बेदम मारहाण केली. त्यात त्याचे डोक फुटले आहे.

जखमीचा जबाब नोंदविला
उमर खान याला तिघांनी डोके,हात, पाय व पोटावर मारल्याने डोक्यातून प्रचंड रक्तस्त्राव सुरु झाला. तशाच अवस्थेत त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक समाधान पाटील व कॉन्स्टेबल भरत लिंगायत यांनी जिल्हा रुग्णालयात जावून जखमीचा जबाब नोंदविला. घटनास्थळ गाठले असते मारेकरी तेथून गायब झाले होते. रविवारी पहाटेही ते घरी आढळून आले नाही. तिघांविरुध्द घरात घुसून व शस्त्राने मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.