धुळे । महापालिकेत मालमत्ता, पाणीपट्टी आदी करांचा भरणा करण्यासाठी येणार्या धुळेकर नागरिकांना गेल्या दोन दिवसांपासून सर्व्हर डाऊनच्या नावाखाली ताटकळत ठेवण्याचा प्रकार सुरू आहे. ऑनलाईन करभरणा करण्यासाठी उभारलेली संगणकीय यंत्रणा ठप्प असल्याने कर्मचारी हातावर हात ठेऊन बसले आहेत आणि कर भरण्यासाठी आलेले नागरिक रांगा लावून दालनाबाहेर उभे आहेत, असे चित्र महापालिका आवारात बघायला मिळत आहे.
सोमवारपासून सर्व्हर बंद
काल दि.19 रोजी दुपारी 12 वाजेनंतर बदं पडलेला सर्व्हर आज दि.20 रोजी देखील बंदच होता. त्यामुळे वसूली विभागात सहआयुक्त अभिजीत कदम यांच्या दालनात सुरू करण्यात आलेले संगणकीय कक्षाबाहेर नागरिकांची भलीमोठी रांग हातात पावत्या घेऊन सकाळपासून उभी होती. त्याचप्रमाणे मनपा आवारातील दूरध्वनी कक्षाबाहेर पाणीपट्टी भरणा केंद्रावर तसेच प्रवेशद्वाराजवळील चलन भरणा केंद्रासमोरही नागरिक तिष्ठत उभे असल्याचे आढळून आले.
थकबाकी भरण्यासाठी गर्दी
सध्या मार्चअखेरमुळे महापालिकेत मालमत्ता, पाणीपट्टी करांचा भरणा करण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. शास्तीमाफीची अभय योजना जाहिर करण्यात आल्याने नागरिक आपले थकबाकी भरण्यासाठी महापालिकेत रांगा लावत आहेत. परंतु प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा व बेफीकीरीचा अनुभव धुळेकरांना पदोपदी येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून ऑनलाईन करभरणा करण्यासाठी उभारलेल्या संगणकीय प्रणालीचा सर्व्हर बंद असल्याचे कारण देत वसूली विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे.
..तर हाताने लिहून पावत्या देणार
गेल्या दोन दिवसांपासून नागरिकांना सर्व्हर बंद असल्याचे पोष्टर दाखवून कर्मचारी हात हालवल बसले असल्याची संतप्त प्रतिक्रिया अनेक नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली. दरम्यान उपायुक्त रविंद्र जाधव यांना काही नागरिकांनी आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास त्यांच्या दालनात जाऊन याबद्दल प्रश्न विचारले असता त्यांनीही कालपासून सर्व्हर बंद आहे, त्यामुळे कर भरण्याचे काम ठप्प असून आज हा सर्व्हर सुरू होईल. दुरुस्तीसाठी माणसे आली आहेत, जर सर्व्हर सुरू झाला नाही. तर हाताने लिहून पावत्या देण्याचे आणि भरणा करण्याचे काम सुरू करू, असे आश्वासन दिले