महाडीबीटी पोर्टलवर तांत्रिक अडचण ; आता ई-विकास वेबसाईट अर्ज करण्याच्या सूचना
भुसावळ– सरकारच्या ऑनलाईन यंत्रणेत तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून शिष्यवृत्ती न मिळाल्याने त्यांच्यात तीव्र नाराजीचे वातावरण आहे. शैक्षणिक वर्ष संपण्यास केवळ तीन महिन्यांचा अवधी शिल्लक असताना शिष्यवृत्तीचा घोळ अद्याप कायम आहे. महाडीबीटी पोर्टलवर तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने या पोर्टलऐवजी सरकारने ई-विकास वेबसाइटवर अर्ज करण्याच्या सूचना दिल्याने विद्यार्थ्यांच्या मनस्तापात भर पडली आहे. अर्ज करण्यासाठी पुन्हा सायबर कॅफे किंवा अन्य ठिकाणी धावपळ करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे.
सामाजिक विभागाच्या सहसचिवांकडे तक्रार
शिवसेना पदाधिकारी प्रा.धीरज गणेश पाटील यांनी या संदर्भात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहसचिव दिनेश रामचंद्र डिंगळे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. महाडीबीटी पोर्टलवर निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे 2017-2018 शैक्षणिक वर्षातील इतर मागास वर्गिय, अनुसूचित जाती-जमाती, विशेष मागास वर्गीय, अल्पसंख्यांख विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. आता ई-विकास वेबसाइटवर अर्ज भरण्याबाबत सरकारने आदेश दिल्याने विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा की शिष्यवृत्तीचे फॉर्म भरण्यासाठी धावपळ करायची ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवाय फॉर्म भरायला सायबर कॅफेत जावे लागणार असल्याने विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. अर्जासाठी सायबर कॅफेमध्ये 100 ते 200 रुपये द्यावे लागणार आहेत. या वेबसाईटला तांत्रिक अडचणी येणार नाही याची काय शाश्वती? असा प्रश्न प्रा.पाटील यांनी उपस्थित केला आहे.