ऑर्डनन्सच्या जमिनीवर अदानी-अंबानींचा डोळा

0

एआयडीईएफचे महासचिव सी.श्रीकुमार यांचा खळबळजनक आरोप ; निवडणुकीतील फडींगसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशच काढला विक्रीला ; संरक्षण मंत्री डॉ.सुभाष भामरेंना आश्‍वासनाचा विसर

भुसावळ- पंतप्रधान मोदी सरकारने देशच विक्रीला काढला असून देशाच्या सुरक्षिततेत महत्त्वाची जवाबदारी निभावणार्‍या संरक्षण क्षेत्रातील तब्बल 250 उत्पादने अदानी-अंबांनींसारख्या बड्या उद्योजकांना निर्मितीसाठी देवून देशाची सुरक्षितता धोक्यात आणण्याचे काम या सरकारने केले असून या बड्या उद्योजकांचा आता ऑर्डनन्सच्या देशातील 60 हजार एकर शेतीवर डोळा असल्याचा खळबळजनक आरोप एआयडीईएफचे महासचिव सी.श्रीकुमार यांनी येथे केला. ‘संरक्षण क्षेत्राचे होत असलेले खाजगीकरण’ याबाबत 23 ते 25 दरम्यान तीन संघटनांनी देशव्यापी संप पुकारला असून त्या संदर्भात माहिती देण्यासाठी सोमवारी पत्रकार परीषदेचे ऑर्डनन्स फॅक्टरीतील कामगार कार्यालयात आयोजन करण्यात आले. याप्रसंगी सी.श्रीकुमार बोलत होते.

खाजगीकरणामुळे 25 फॅक्टरी अडचणीत
सी.श्रीकुमार म्हणाले की, देशातील ऑर्डनन्स फॅक्टरीत यापूर्वी 650 प्रकारच्या संरक्षण उत्पादनांची निर्मिती होत होती मात्र मोदी सरकारने तब्बल 250 उत्पादने अदानी-अंबानींसारख्या बड्या उद्योजकांना निर्मितीसाठी दिल्याने देशातील 25 ऑर्डनन्स फॅक्टरी अडचणीत आल्या आहेत. परीणामी नोकर भरती बंद असून रविवारचा ओव्हर टाईमही, आर्मीतील वर्कशॉप बंद करण्यात आला आहे तसेच आर्मीला दुधाला पुरवठा करण्यासाठी असलेल्या डेअरीफार्मही बंद कराव्या लागल्या. संरक्षण क्षेत्र वाचवण्यासाठी गतवर्षी लोकसभेबाहेर 37 दिवस उपोषण केले, सरकारने आश्‍वासन दिले मात्र प्रत्यक्षात त्याची पूर्तीच केली नाही.

सरकारमधील मंत्र्यांमध्ये मतभेद
मोदी सरकारमधील तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी 20 हजार कोटींचा माल तयार करण्याचे निर्देश दिले होते तर त्यानंतर 17 कोटींचा माल उत्पादीत करण्यात आला तर त्यानंतर आलेल्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी अवघे 650 कोटींचे उद्दिष्ट दिले मात्र याबाबत दबावगट वाढल्यानंतर 11 हजार 700 कोटींचे उद्दिष्ट देण्यात आल्याचे सी.श्रीकुमार म्हणाले.

23 ते 25 दरम्यान देशव्यापी संप
संरक्षण क्षेत्रातील वाढते खाजगीकरण तसेच जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी 23 ते 25 दरम्यान इंटक, बीएमएससह एआयडीईएफ या संघटनांनी बंदची हाक दिली आहे. हा केवळ ट्रेड युनियनचा संप नसून सर्वसामान्य नागरीकांनीही या संपात सहभागी व्हावे, असे आवाहन सी.श्रीकुमार यांनी केले. देशाच्या सुरक्षितेविषयी या भाजपा सरकारची निती चांगली नाही, थेट देशच त्यांनी विक्रीसाठी काढला असून निवडणुकीत वारेमाप पैसा उधळण्यासाठी अदानी-अंबांनी सारख्या बड्या उद्योजकांना वाव दिला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. काँग्रेस सरकारच्या काळात बोफोर्स गाजले तर आताच्या सरकारच्या काळात राफेल गाजत असल्याचे ते म्हणाले.

संरक्षण मंत्र्यांना आश्‍वासनाचा विसर -राजेंद्र झा
भुसावळ ऑर्डनन्समध्ये पिनाका पॉड प्रकल्प उभारणीचे काम सुरू असतानाच उत्पादन खाजगी उद्योजकांकडून करण्याचा सरकारचा घाट सुरू असून संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांना आश्‍वासनाचा विसर पडला असून सरकारच्या खाजगीकरणाला वाव या धोरणामुळे छोट्या सप्लायर्सवर बेरोजगारीचे संकट कोसळणार असल्याचे एआयडीईएफचे उपाध्यक्ष राजेंद्र झा म्हणाले. तीन दिवसीय संपामुळे सुमारे 300 कोटींचे उत्पादन ठप्प होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यांनी घेतले परीश्रम
पत्रकार परीषदेला बी.बी.मुजूमदार, दिनेश राजगिरे यांची प्रमुख उपस्थिती होती तर यशस्वितेसाठी दिनेश राजगिरे, प्रवीण पाटील, प्रवीण मोरे, जितू आंबोडकर, दीपक भिडे, अतुल पाटील, राजू निकम, हिरालाल पारीसकर, प्रवीण पाटील, जितू मोरे, राजू तडवी, दीपक आंबोडकर, सूर्यभान गाढे, महेंद्र पाटील, नितीन पाटील, साखळकर आदींनी परीश्रम घेतले.