ऑस्ट्रेलिया गाजवित पुण्याच्या तालमीतील राहुल आवारेची सुवर्णकमाई!

0

राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक
जांभुळवाडीतील क्रीडा संकुलात दिवाळी साजरी

पुणे  – पुण्याच्या तालमीत कुस्तीचे धडे गिरवणारा कुस्तीपटू राहुल आवारेने यंदाच्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत 57 किलो वजनी गटात कॅनडाच्या स्टीफन ताकाहाशीवर 15-7 अशा दणदणीत फरकाने मात करत सुवर्णपदक पटकावले. राहुलने कुस्तीपटू काका पवार यांच्या पुण्यातील तालमीत कुस्तीचे धडे गिरवले आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीमध्ये सुवर्णपदक पटकावणारा राहुल हा मूळचा बीडचा असला तरी कुस्तीपटू म्हणून त्याची संपूर्ण जडणघडण ही पुण्यात झाली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राहुलला कुस्तीसाठी दत्तक घेत आर्थिक सहाय्य केले होते.

काका पवारांच्या तालमीत जल्लोष
राहुलच्या विजयाने पुण्यातल्या जांभुळवाडी परिसरात असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात एकच जल्लोष झाला. या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात अर्जुन पुरस्कार विजेते कुस्ती प्रशिक्षक काका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राहुलने कुस्तीचे धडे गिरवले आहेत. राहुलने भारतासाठी सुवर्ण मिळवल्याने येथील सर्वांनी दिवाळीच साजरी केली. राहुलची मॅच असल्याने सर्वाचे लक्ष हे त्याच्या कुस्तीकडे होते. सुरुवातीला राहुल काही गुणांनी मागे पडल्यावर येथील पैलवानांच्या आणि प्रशिक्षकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. मात्र त्यांनतर राहुलने मुसंडी मारत जीगरबाज खेळ केला.

राहुलच्या यशाने वस्ताद भारावले
आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलातील इतर पैलवानांनी राहुलच्या कुस्तीचा अभ्यास करावा आणि राहुलच्या पाठोपाठ आणखी दहा राहुल तयार व्हावे, अशी इच्छा काका पवार यांनी व्यक्त केली. राहुलच्या विजयाने खूप आनंदित आहे. त्यांने सुवर्णपदक जिंकून देशाचे आणि महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. राहुलने 2022 मध्ये टोकियोत होणार्‍या ऑलिम्पिकमध्ये असेच घवघवीत यश मिळवावे आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कुस्तीपटू सुशीलकुमार यानेही पदकाची कमाई केली आहे. त्याचे ही अभिनंदन काका पवार यांनी यावेळी केले.

मरणाची मेहनत करुन पोरगं जिंकलं!
राहुलची मेहनत कामी आली. पोराने मरणाची, रात्रं दिवस तयारी केली होती, त्याचा आम्हाला खूपच अभिमान आहे. बारा वर्षांच्या मेहनतीने महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळाले. हा माझा पठ्ठ्या आहे. त्याच्यावर अनेकवेळा अन्याय झाला, मात्र त्या अन्यायावर मात करण्यासाठी देवाने त्याला साथ दिली. तो बारा वर्षे सतत कुस्ती खेळतोय. आज त्याने आमची मेहनत सार्थ केली. माझ्याकडे आल्यानंतर त्याने बरीच मेहनत घेतली. माझं आणि माझ्या गुरुचं स्वप्न पूर्ण केलं. 2020 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत मला त्याच्याकडून मेडल हवं आहे.
-काका पवार, राहुलचे प्रशिक्षक