ओझरखेडा धरण परीसरात केवळ नावालाच वृक्षलागवड

0

 

वृक्षरोपांचे फोटोसेशन करून शासनाच्या डोळ्यात धूळफेक

भुसावळ- शासनाच्या माध्यमातून जुलै महिन्यात शतकोटी वृक्ष लागवड मोहिमेतंर्गत विविध ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवण्यात आला.तसेच सर्व शासकीय विभागालाही वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानुसार ओझरखेडा येथील धरण परीसरात वृक्षारोपण करण्यात आले मात्र या भागात केवळ फोटोसेशन पुरती वृक्षरोपांची लागवड करून शासनाच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रयत्न झाल्याचे चित्र आहे. शासनाने दरवर्षाप्रमाणे यंदाही जुलै महिन्यापासून मोठ्या प्रमाणात वृक्षलागवडीची मोहिम हाती घेतली आहे तसेच वृक्षरोपांच्या लागवडीसाठी सर्व शासकीय विभागांनाही उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानुसार ओझरखेडा धरण परीसरात संबधीत विभागाच्या अधिकार्‍यांनी जुलै महिन्यात धरणाच्या परीसरात वृक्षरोप लागवडीचा कार्यक्रम घेतला मात्र शतकोटी वृक्ष लागवडीतंर्गत करण्यात आलेली वृक्ष रोपांची लागवड केवळ फोटोसेशन पुरती करण्यात आल्याचे दिसून येत आहे. लागवड करण्यात आलेल्या वृक्ष रोपांना कुठल्याही प्रकारचे संरक्षण दिले गेले नसल्याने बहुतांश रोपे गुरा-ढोरांनी फस्त करण्यास सुरूवात केली आहे तसेच वृक्ष रोपे पाणी व देखभालीअभावी नाहीसे होत असल्याने वृक्ष रोपांची लागवड करून उपयोग काय ? असा प्रश्न निर्माण होत आहे. यामुळे संबधीत विभागाच्या अधिकार्‍यांनी या प्रकाराकडे वेळीच लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

वृक्ष रोपांचे केवळ फोटोसेशन
ओझरखेडा धरण परीसरात अधिकार्‍यांनी केवळ फोटोसेशन पुरती वृक्ष रोपांची लागवड करण्यात आल्याचे सद्यस्थितीत दिसून येत आहे. यामुळे शासनाच्या शतकोटी वृक्ष रोपांची लागवड केवळ नावालाच होत असल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे. याकडे शासनाच्या वरीष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.