बारामती । मोठ्या थाटामाटात बारामती नगरपालिकेच्या श्रीगणेश मंडईचे उद्घाटन झाले. या मंडईचे उद्घाटन होऊन आता जवळपास पावणेदोन महिन्यांचा काळ संपत आला आहे. तरीही ओटाधारकांना नवीन मंडईत जाण्यासाठी प्रतिक्षाच करावी लागत आहे. नगरपालिका पुढच्या आठवड्यात स्थलांतर होईल, असे दर आठवड्याला सांगत आहे. परंतु प्रत्यक्षात कार्यवाही होत नाही. नगरपालिकेने ओटाधारकांच्या यादीत घोळ केल्याने ओटाधारक संतप्त आहेत. त्यांची समजूत कशी काढायची असा गंभीर पेच नगरपालिकेला पडला आहे.
विकासाच्या प्रक्रियेतून सर्वसामान्य गायब
शहराची लोकसंख्या एक ते सव्वा लाखाच्या आसपास असून केवळ नियोजनाअभावी अस्ताव्यस्त असे हे शहर वाढत आहे. एमआयडीसी परिसर विकसीत होत असताना मुलभूत गरजाही पुरविणे गरजेचे आहे. परंतु त्याबाबत नगरपालिकेचे नियोजनच नसल्याचे दिसून येते. धनदांडग्या बिल्डर्सनी व राजकीय पदाधिकार्यांनी या भागातले मोठाले भूखंड वापरून शॉपिंग मॉल्स उभारले आहेत. मात्र, गरीब, गरजू व बेरोजगार तरुणांना परवडतील असे छोटाले गाळे विकसीत केले गेले नाहीत. यावरून या विकासाच्या प्रक्रियेत सर्वसामान्य माणूस दिसून येत नाही. हेच मंडईच्या उदाहरणावरून स्पष्टपणे जाणवत आहे. नगरपालिकेस मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होऊन देखील दूरदृष्टीची उणीव प्रकर्षाने जाणवत आहे.
नियोजनाचा अभाव
बारामती तालुक्यात व परिसरात या मंडईची फार चर्चा झाली. मात्र, नियोजनाअभावी तेवढीच बदनामीही झाली. शहरात दोन मंडईची गरज आहे. एमआयडीसी भागात नगरपालिकेने भव्य मंडई उभारावी, अशी बारामतीकरांची मागणी असताना अत्यंत छोट्या जागेत सूर्यनगरी येथे भाजी विकण्यास जागा उपलब्ध करून दिली आहे. वास्तविक पाहता बारामतीच्या मंडईपासून सूर्यनगरी हे पाच किमी अंतरावर आहे. एमआयडीसी परिसर व सूर्यनगरीचा परिसर या भागातील लोकांना तेथेच चांगल्या प्रकारची सोय झाल्यास त्यांना मुख्य शहरात येण्याची गरज भासणार नाही. या भागात गुरूवार सारखाच आठवडी बाजार सुरू करावा, ही साधीशी गोष्टही नगरपालिकेस जमत नाही याचे आश्चर्य वाटल्यावाचून राहात नाही.
उद्घाटनाची घाई का?
बारामती मंडईचा चेहरा मोहरा बदलून एक आदर्श मंडई होईल, अशा केवळ वल्गनाच केल्या गेल्या. चार मजली मंडईची इमारत बांधूनदेखील पूर्ण नियोजन नसताना उद्घाटनाचीच घाई का केली असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. उद्घाटनानंतर सर्वसाधारणत: चार-पाच दिवसात मंडई हस्तांतर होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, ही अपेक्षा फोल ठरली. त्यामुळे आता केवळ वाट पाहणे एवढेच सर्वसामन्य ओटाधारकांच्या हाती राहीले आहेे.
पालिका प्रशासन अडचणीत
मूळ ओटाधारकांमध्ये शंभर जास्त नावे दिसून आली आहेत. मात्र मूळ ओटाधारकांना आजूबाजूची जागा देऊन नवीन घुसणार्या ओटाधाकांना चांगल्या जागा द्यायच्या असा प्रकार झाल्यामुळे पदाधिकारी व नगरपालिका प्रशासन चांगलेच अडचणीत सापडले आहे. सध्याच्या परिस्थितीत अत्यंत कमी जागेत व अपुर्या सोयी सुविधा असलेल्या ठिकाणी नवीन गुणवडी चौकाजवळ ओटाधारक आपला व्यवसाय करीत आहेत. अस्ताव्यस्त अशा या जागेत बराच काळ काढल्यामुळे आतातरी नवीन मंडईत आपण जाऊ अशी आशा बाळगून ओटाधारक आहेत. या नवीन गुणवडी चौकाजवळ वाहतुकीचा गंभीर प्रश्न असून वाहने लावण्यास जागाच नसल्यामुळे या अडचणीत अधिकच भर पडत आहे. या ठिकाणी शेतकर्यांना आपला माल विकण्यास योग्य अशी जागाच नाही. अशा दुहेरी अडचणीत ओटाधारक शेतकरी व ग्राहक सापडलेला आहे. मात्र नगरपालिकेला याचे काहीही सोयरसूतक नाही.