भुसावळ। बहुसंख्य असलेल्या ओबीसींनी म्हणजेच इथल्या मुलनिवासींनी एकत्रच येऊ नये व आपल्या न्याय हक्कासाठी लढू नये म्हणून शेकडो जातीत विभागणी करण्यात आली. आजही एससी, एसटीच्या लोकांमुळे ओबीसींना नोकर्या मिळत नाही अशी दिशाभूल करुन षडयंत्र रचून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे ओबीसींच्या न्याय हक्कासाठी लढले. त्यासाठी त्यांनी राजीनामासुद्धा दिला. आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंदोलनाची प्रेरणा घेऊन मागास वर्गातील लोक ओबीसींच्या न्यायहक्कासाठी लढत असल्याचे प्रतिपादन अजय पडघन यांनी केले.
यांची होती उपस्थिती
शहरात बहुजन क्रांती मोर्चातर्फे ‘स्वातंत्र्या नंतरच्या काळात ओबीसी समाजाची दशा व दिशा एक मंथन’ याविषयावर आयोजित व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते. विचारमंचावर एस.एस.जंगले, अॅड.यु.एम. जगताप, एस.पी. भिरुड आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे उद्घाटन जंगले यांनी केले. यशस्वितेसाठी सहकार्य करणार्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गुणवंत विद्यार्थी भुषण बहाळे व सिद्धार्थ सपकाळे यांचा देखील सत्कार करण्यात आला.
आरटीई शिक्षणाची प्रेरणाच नष्ट करणारा कायदा
पुढे बोलतांना पडघन म्हणाले की, 85 टक्के बहुजन हे 50 टक्के आरक्षणात खेळत आहे. तर साडेतीन टक्के उच्चवर्णीय 50 टक्के मध्ये खेळत आहे. ओबीसींच्या मुलांना वर्ग 1 अधिकारी होण्यापासून वंचित ठेवण्यात येत आहे. शिक्षणाचा आरटीई कायदा हा शिक्षणाची प्रेरणाच नष्ट करणारा कायदा असून यातून ढकलपास झालेली मुले ही मजूर होतील. पुढे त्यांना सेझमध्ये मजूरीसाठी लावण्यात येईल. स्वातंत्र्याचा एकच मार्ग म्हणजे राष्ट्रव्यापी जनआंदोलन. या जनआंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन पडघन यांनी ओबीसी बांधवांना केले.
राज्य घटनेचे वाचन करुन खरा इतिहास समजून घेण्याचे आवाहन
राज्य घटनेचे वाचन करा व खरा इतिहास समजून घ्या असे कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सुनिल भिरुड यांनी सांगितले. या सभेचा उद्देश ओबीसी बांधवांमध्ये अधिकारांची जागृती निर्माण होणे हा आहे. सुशिक्षीतांना भडकविण्याचे सध्या काम सुरु आहे. एससीएसटीमुळे नोकर्या गेल्या हे खोटंं असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक आर.पी. तायडे, सुमित्र अहिरे यांसह सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन महेंद्र पाटील यांनी केले. तर आभार सुनिल वानखेडे यांनी मानले.