निजामपूर/जैताणे । धुळे येथील ओबीसी विद्यार्थी-शिक्षक-पालक विकास असोसिएशनतर्फे येथील निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे इंग्रजी विषयाचे शिक्षक प्रा. भगवान बापूजी जगदाळे यांना कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक गटातून काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अॅड. ललिता पाटील, प्रकाश सोनवणे, असोसिएशनचे अध्यक्ष विलासराव पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते गुरुगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. धुळे येथील गरुड वाचनालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात आला. ओबीसी शिक्षक असोसिएशनचे अध्यक्ष विलासराव पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
नाशिक विभागातून 107 शिक्षकांना पुरस्कार
असोसिएशनतर्फे महात्मा जोतीराव फुले स्मृतिदिन दरवर्षी ’शिक्षकदिन’ म्हणून साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन व वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, प्राध्यापकांच्या चारही गटातून एकूण 54 शिक्षक, प्राध्यापकांना सन्मानित करण्यात आले. यावर्षी नाशिक विभागातील एकूण 107 शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात आला. यात प्राथमिक गटातून 21, माध्यमिक गटातून 70, कनिष्ठ महाविद्यालयीन गटातून 11, तर वरिष्ठ महाविद्यालयीन गटातून 5 शिक्षक, प्राध्यापकांचा समावेश आहे. यावेळी प्रा. एस. के. चौधरी, एस. एम. पाटील, राजेंद्र लोंढे, आर. व्ही. पाटील, प्राचार्य डॉ. सुरेश नंदन, मधुकर गांगुर्डे, प्रा. भरत काळे, प्रा. सुनील पवार, प्रा. शैलेश राणे, प्रल्हाद साळुंके, महेश मुळे, सुनील मोरे, झाकीर सय्यद, दीपक महाले, किशोर पाटील, प्रा. आर. ओ. मगरे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी अॅड. ललिता पाटील, प्रकाश सोनवणे, विलासराव पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.