ओम समर्थ, सरस्वती, विद्यार्थी, अमरहिंद उपांत्य फेरीत

0

मुंबई । मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने व इन्सपायर ग्रुप आयोजित कुमार, मुली गटाच्या जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेतील कुमार गटाच्या उपांत्यपूर्व लढतीत आपापले सामने जिंकत ओम समर्थ, सरस्वती, विद्यार्थी व अमरहिंद संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश निश्‍चित केला. कुमारांमध्ये अटीतटीच्या लढतीत सरस्वतीच्या संघाने विजय क्लब, दादर या संघावर 9-9-7-6 (16 विरुद्ध 15) अशी अवघ्या एका गुणाने मात केली. मध्यंतराला दोन्ही संघांची स्थिती बरोबरीत होती. मात्र, शुभम कांबळे आणि राहुल जावळे यांनी उत्तम संरक्षणाच्या जोरावर सामना आपल्या संघाच्या बाजूला झुकवला. सरस्वतीतर्फे शुभम कांबळे ( 0:40, 2:30 मि. संरक्षण व 1 गडी ), राहुल जावळे (0:50 मि.2:00 मि. संरक्षण व 5 गडी ) व संकेत दायमा (1:00, 2:00 मि. 2 गडी ) तर विजय क्लबतर्फे विशाल मेस्त्री (2:30, 2:20 मि. संरक्षण व 3 गडी ), परशुराम कोळी (2:10, 1:00 मि. संरक्षण व 2 गडी ) व मुकेश सूर्यवंशी (3 गडी ) यांनी चांगली झुंज दिली.

कुमार गटातील अन्य सामन्यात विद्यार्थी क्रीडा केंद्र या संघाने श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादर या संघाचा प्रतिकार 3-7-5-2 (9 विरुद्ध 8) असा एक गुण व 7:30 मि. राखून पराभव करत मोडून काढला. विद्यार्थीतर्फे विशाल मेस्त्री (0:50 मि. नाबाद संरक्षण व 6 गडी ), रसाळ प्रेम (4:00, 2:50 मि. संरक्षण ) व ऋषिकेश पडेळकर (1:30, 2:00 मि. संरक्षण) तर श्री समर्थच्या प्रतीक होडावडेकर याने (4:30 मि. संरक्षण व 1 गडी) व वरद फाटक (1:20, 1:00 मि. संरक्षण व 2 गडी) या दोघांनी चांगला प्रतिकार केला.

ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर या संघाने युवक क्रीडा मंडळाचा 13-4-4 ( 13 विरुद्ध 8 ),असा एक डाव 5 गुणांनी धुव्वा उडवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. या सामन्यात ओम समर्थचा सनी तांबे (5:00 मि. संरक्षण व 2 गडी ) कार्तिक राजभर (300 मि. संरक्षण व 1 गडी ) शुभम शिगवण (4 गडी ) युवकतर्फे शुभम मोंढे (2:00 मि. संरक्षण व 2 गडी) यांनी चांगला खेळ केला. कुमारांमध्ये अमरहिंद मंडळ या संघाने स्टुडंट्स स्पोर्ट्स या संघाचा 13-4, असा एक डाव व 9 गुणांनी पराभव केला.