पुणे । शवविच्छेदन अहवालावरून मयताचे वय निष्पन्न होते. मात्र कृषी अधिकार्यांनी तो मागितला नसल्याने मयताच्या वयाचा पुरावा जोडला गेलेला नाही, त्यामुळे पुरावा नसल्याचे कारण दाखवत क्लेम नाकारणे योग्य नसल्याचा निष्कर्ष काढत शेतकर्यांचा क्लेम नाकारणार्या विमा कंपनीला ग्राहक मंचाने दणका दिला आहे. अपघातात घडलेल्या तारखेपासून 7 टक्के वार्षिक व्याजाने क्लेमचे 1 लाख रुपये, तक्रार अर्जाचा खर्च म्हणून 3 हजार रुपये देण्यात यावेत, असा आदेश ग्राहक मंचाचे अध्यक्ष एम. के. वालचाळे, सदस्य शुभांगी दुनाखे आणि एस. के. पाचरणे यांनी दिला आहे. निकालाची प्रत मिळाल्यापासून 6 आठवड्याच्या आत या निकालाची अंमलबजावणी करावी, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. मंचाने हा आदेश दिला आहे.
सीता पोळ (रा. भोर) यांनी ओरिएंटल इन्श्युरन्स, नागपूर, तालुका कृषी अधिकारी, भोर आणि कबाल इन्श्युरन्स, शिवाजीनगर यांच्याविरोधात 21 फेब्रुवारी 2013 रोजी अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच येथे तक्रार दाखल केली होती. सुनील यांचा 30 मार्च 2008 रोजी वाघोली येथून गावी जात असताना अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर सर्व आवश्यक कागदपांत्रासह सीता यांनी तलाठी कार्यालयात क्लेमचा हक्क सांगितला. त्यानंतर त्यांना काही कळविण्यात आले नाही. क्लेमचे 1 लाख, नुकसानभरपाईपोटी 20 हजार आणि तक्रार अर्जाचा खर्च म्हणून 5 हजार रुपयांची मागणी ग्राहक मंचात केली. तिन्हीही जाब देणार्यांनी सीता यांच्या क्लेमच्या मागणीस विरोध केला. ओरिएंटल विमा कंपनीचे प्रतिनिधी ग्राहक मंचात हजर झाले. मात्र, त्यांनी लेखी कथन केले नाही. तर भोर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने तक्रारदार ग्राहक नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला.