औद्योगिकनगरीला देहूचे पाणी!

0

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा आराखडा तयार
इंद्रायणीतील देहू बंधार्‍यातून पाणी उचलण्याची परवानगी मागितली

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील वाढीवक्षेत्रातील गावांना पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी आंद्रा आणि भामा आसखेड धरण पाणीपुरवठा योजनेंतर्गत बोडकेवाडी येथील धरणातून पाणी उचलण्यात येणार आहे. यासाठी इंद्रायणीनदीवरील देहू बंधार्‍यातून शंभर एमएलडी पाणी उचलण्याची परवानगी मागितली आहे.

शहराला 470 एमएलडी पाण्याची कमतरता
पिंपरी-चिंचवड महापालिकेची लोकसंख्या 22 लाखावर पोहोचली आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्पाची संख्या वाढल्याने 470 एमएलडी पाणी कमी पडत आहे. जलसंपदा विभागाकडून पिण्याच्या पाण्याचा कोटा वाढविण्यात आलेला नाही. परिसरात गेल्या वर्षभरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. याचे प्रमुख कारण पिण्याच्या पाण्याचे ढिसाळ व्यवस्थापन हे एक आहे. त्याचबरोबर रखडलेली पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प, भामा आसखेड आणि आंद्रा धरणातून पाणी आणण्याची योजना पूर्णत्वास गेलेली नाही. पाणी आरक्षणासाठी पत्रव्यवहार केलेला आहे. तसेच हे काम पूर्ण होण्यास किमान दोन वर्ष लागणार असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे शहरातील कोणत्याही भागात पूर्णदाबाने पाणीपुरवठा होत नाही.

महापालिकेकडून पाणी आणण्याचे नियोजन
आंद्रा व भामा आसखेड धरणातील मुख्य जलवाहिनी मंगरूळ व करंजविहिरे ते नवलाख उंब्रे येथील नियोजित बीपीटीपर्यंत व एकत्रित गुरूत्व जलवाहिनी नवलाख उंब्रे ते बीपीटी चिखली येथील नियोजित जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने पर्यायी पाणीपुरवठा योजनेसाठी देहू येथील बंधार्‍यातून चिखलीत पाणी आणून तेथून जवळच्या गावात पुरवठा केल्यास प्राणी प्रश्‍न कमी होईल, असा विश्‍वास प्रशासनाला वाटत आहे. याबाबत बोलताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, देहूगाव येथील बंधार्‍यातून पाणी उचलण्यासाठी आराखडा तयार केला आहे. शंभर एमएलडी पाण्याची मागणी केली आहे. हे आरक्षण मंजूर झाल्यास परिसरातील भागास पिण्याचे पाणी पुरविण्यात येणार आहे.