औरंगाबादच्या १७ वर्षीय आसरा शेखवर मुंबईत यशस्वी यकृत प्रत्यारोपण

0

मुंबई | औरंगाबादच्या १७ वर्षीय आसरा शेखवर मुंबईत नुकतीच यशस्वी यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. वोक्हार्ट हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सोशल मीडियामार्फ़त निधी जमविला व तिच्यावर उपचार केले. आसराच्या भावानेही फंड गोळा करण्यासाठी भरपूर मेहनत घेतली.

जुलै महिन्याच्या सुरुवातीला मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये आसरावर तिच्या आईचे ६० टक्के यकृत वापरून यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. गेल्याच आठवड्यात आसराला घरी पाठविण्यात आले आहे. आसराला पुढील आयुष्यात एक चांगली चित्रकार बनायचे असून तिने हॉस्पिटलमध्ये असताना अनेक चित्रे काढून डॉक्टरांना भेट स्वरूपात दिली आहेत.

औरंगाबाद येथे राहणाऱ्या १७ वर्षीय आसरा शेख हिला २ वर्षांपूर्वी हेपटायटीसची लागण झाल्यामुळे तिचे यकृत खराब झाले होते. गेल्या २ वर्षात अनेक उपचार करूनही तिच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नव्हती. कॉलेजमध्ये जाण्याच्या वयामध्ये हॉस्पिटलची ये-जा चालू झाली होती त्यातच घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे उपचारासाठी आर्थीक चणचणही भासू लागली होती. आसराच्या आई वडिलांकडे तिला वाचविण्याकरिता यकृत प्रत्यारोपणाशिवाय कोणताही पर्याय उरला नव्हता. मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पिटलचे यकृत प्रत्यारोपण सर्जन डॉ अनुराग श्रीमाल जेव्हा औरंगाबाद येथे आसराच्या कुटुंबीयांना भेटले असता त्यांनी ही सर्व परिस्थिती त्यांना सांगितली. अभ्यासात हुशार असणारी आसरा या आजारामुळे पुढचे शिक्षण घेऊ शकत नाही व आर्थीक परिस्थितीमुळे यकृत प्रत्यारोपण ही करू शकत नाही अशा दुर्दैवी फेऱ्यात अडकलेल्या मुलीला वाचविण्यासाठी डॉ. अनुराग श्रीमाल यांनी वोक्हार्ट हॉस्पिटलचे संचालक खोराकीवाला यांच्याशी बोलून तिला मुंबईत आणले. मुंबईत आल्यानंतर खरी कसोटी होती ती म्हणजे यकृत प्रत्यारोपणासाठी लागणारे यकृत व २० लाखाचा निधी जमविणे. डॉ. अनुराग श्रीमाल यांनी आसराच्या आईची वैद्यकीय तपासणी करून तिचे यकृत मुलीला वापरू शकतो, असा निष्कर्ष काढून त्यासाठी लागणाऱ्या निधीसाठी सोशल मीडिया मार्फ़त मदतीसाठी आवाहन केले.

इंटरनेट, सोशल मीडिया, राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्था तसेच सरकारी कार्यालये अशा सर्वांच्या मार्फत हळू हळू मदतीचा ओघ सुरु झाला. आसराच्या भावानेही फंड गोळा करण्यासाठी भरपूर मेहनत घेतली. जुलै महिन्याच्या सुरुवातीला मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये आसरावर तिच्या आईचे ६० टक्के यकृत वापरून यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी रीत्या पार पाडली. गेल्याच आठवड्यात आसराला घरी पाठविण्यात आले आहे. आसराला पुढील आयुष्यात एक चांगली चित्रकार बनायचे असून तिने हॉस्पिटलमध्ये असताना अनेक चित्रे काढून डॉक्टरांना भेट स्वरूपात दिली आहेत.

वोक्हार्ट हॉस्पिटलचे केंद्र प्रमुख डॉ. पराग रिंदानी म्हणाले , “आसरामध्ये असलेली जगण्याची जिद्द व शिक्षणावरील प्रेम पाहता कोणतीही आर्थीक मदत नसताना डॉ. अनुराग श्रीमाल यांनी या मुलीला मुंबईत आणून तिच्यावर यशस्वी यकृत प्रत्यारोपण करून आमच्या हॉस्पिटलच्या ब्रीदवाक्य असलेल्या “लाईफ विन्स ” ची असलेली बांधीलकी या निमित्ताने अधोरेखित केली. डिसेंबर २०१६ पासून मुंबईतील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये आम्ही यकृत प्रत्यारोपण सुरु केले असून अनेक यशस्वी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्या आहेत.”