औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयानंतर मनपा प्रशासन गतीशील

0

जळगाव। महानगर पालिकेच्या मुदत संपलेल्या 18 मार्केटमधील 2175 गाळे दोन महिन्यात ताब्यात घेण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. ही प्रक्रीया 15 दिवसांत सुरू करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. यापूर्वी महानगर पालिका प्रशासनाने पहिल्या टप्प्यात नोटीस देऊन सुनावणी घेतली आहे. अशा सुनावणी पूर्ण झालेले 650 गाळे ताब्यात घेण्याची प्रक्रीया राबविण्याबाबत चाचपणी महानगर पालिकीतर्फे करण्यात येत आहे.

सुनावणीनंतर कारवाई शक्य
महानगर पालिकेच्या 18 मार्केटमधील 2175 गाळ्यांची भाडेकराराची मुदत संपल्याने महानगर पालिकेने या गाळेधारकांना 81 (ब) नुसार नोटीसा दिल्या होत्या. यानुसार प्रशासनाकडून चाचपणी केली जात आहे. उर्वरित जे गाळे आहेत. त्या गाळेधारकांना नोटीस दिल्या आहेत. त्यांची सुनावणी घेवून त्यावर निकाल द्यावे लागतील नतंर ते ताब्यात घेण्याची कारवाई करता येणार असल्याची माहीती महापौर नितिन लढ्ढा यांनी दिली आहे.

गाळेधारकांकडून आव्हानाची तयारी
महानगरपालिका मार्केटमधील मुदत संपलेल्या गाळेधारकांमध्ये औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाने खळबळ उडाली आहे. खंडपीठाच्या निकालाची प्रत हाती आल्यानतंर गाळेधारकांकडून सुप्रिम कोर्टात या आदेशाला आव्हान देण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. या 650 गाळ्यांमध्ये सेन्ट्रल फुले मार्केट- 311, रामलाल चौबे मार्केट – 40, भोईटे मार्केट – 24, जुने बी.जे. मार्केट -216, डॉ.आंबेडकर मार्केट -64 यांचा समावेश आहे.

600 कोटी मिळणार
मुदत संपलेल्या गाळ्यांचा लिलाव केल्यात त्यातून महानगर पालिकेला 600 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. रेडीरेकनर दराचा आधार घेऊन गाळ्यांचा लिलाव केला जाणार आहे. या गाळेधारकांकडे 4 वर्षाची भाड्याची थकबाकी व त्यावरील पाचपट दंडाची वुसली देखिल करण्यात येणार आहे. त्यातून सुमारे 200 कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. दरम्यान महानगर पालिका मालकीच्या मुदत संपलेल्या 18 व्यापारी संकुलातील 2 हजार 175 गाळे भाडे कराराची मुदत संपली आहे. यामुळे हे गाळे ताब्यात घेण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. या आदेशाने गाळेधारकांमध्ये घबराट पसरली असून भवितव्याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे.