पुणे । बदलत्या हवामानामुळे जिल्ह्यात सर्दी, ताप, खोकला हे साथीचे आजार वाढले असून, प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा आहे. त्यामुळे रूग्णांना वेळेत उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी जिल्ह्यातील नागरिकांकडून येत आहेत. या रूग्णांना वेळेत उपचार मिळावे, औषधाचा तुटवडा जाणवू नये यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना औषध खरेदीसाठी प्रत्येकी 10 हजार रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.
जिल्ह्यात 96 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 539 उपकेंद्रे आहेत. तसेच 23 ग्रामीण रुग्णालये आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते उपकेंद्रांमध्ये औषधांचा तुटवडा होत असल्याच्या तक्रारी जिल्ह्यातील नागरिकांकडून करण्यात येत आहेत. त्या तक्रारींची दखल घेऊन जिल्हा परिषदेच्या सदस्यांनीही आरोग्य विभागाच्या निदर्शनास हे प्रकार आणून दिले आहेत. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत पडसाद उमटले होते. औषधांची उपलब्धता आणि आवश्यक साठा यांची माहिती घेण्यासाठी आता समिती स्थापन करण्यात आली आहे.
निधीचे वितरण
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा तुटवडा होत असल्याच्या तक्रारींची आरोग्य विभागाने दखल घेतली आहे. त्या तक्रारीनुसार प्रत्येक आरोग्य केंद्रांसाठी स्थानिक पातळीवर औषध खरेदीचे अधिकार देण्याचा निर्णय घेतला आहे. औषध खरेदीकरिता आरोग्य केंद्राला प्रत्येकी 10 हजार रुपयांचा निधी देण्याचे ठरले. त्यानुसार जिल्ह्यातील 96 प्राथमिक आरोग्य केंद्रांकरिता 9 लाख 60 हजार रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. त्यामुळे औषधांचा तुटवडा होणार नाही, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी दिली. प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात येणार्या निधीतून जेनेरीक औषधे खरेदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. निधी वितरीत करताना प्रत्येक आरोग्य केंद्राची गरज तपासण्यात आली. या संदर्भातील निधी हा थेट पंचायत समितीकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यांच्यामार्फत पैसे आरोग्य केंद्रांना देण्यात आल्यानंतर औषध खरेदी करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.