पुणे । पुणे कँटोन्मेंट बोर्डातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल टेक्निकल शाळेत औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) सुरू केली जाणार असून, त्यामध्ये कँटोन्मेंट परिसरात वास्तव्यास असणार्या विद्यार्थ्यांसाठी दोन टक्के जागा राखीव ठेवल्या जाणार आहेत. त्यामुळे औंध येथील आयटीआयमध्ये प्रवेश मिळवू न शकणार्या विद्यार्थ्यांना व्यवसायभिमुख अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण घेता येणार आहे. लष्कर परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल शाळेत आयटीआय इन्स्टिट्यूट सुरू करण्यासाठी व त्याअंतर्गत दहा ट्रेडचे प्रशिक्षण देण्यासाठी पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या प्रशासनाने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविला होता.
त्यापैकी मोटर व्हेइकल मेकॅनिक, सिव्हिल ड्राफ्ट्समन, मेकॅनिकल ड्राफ्ट्समन, प्लंबर आणि कम्प्युटर हार्डवेअर हे पाच ट्रेड सुरू करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली होती. त्यासाठी दहा तुकड्या मान्य करण्यात आल्या आहेत. या पाच मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी साधारणपणे 192 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. प्रत्येक कोर्ससाठी चाळीस विद्यार्थी घेतले जाणार आहेत. त्यापैकी दोन टक्के जागा कँटोन्मेंटमधील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव यांनी दिली. राज्य सरकारतर्फे औंध येथे आयटीआय संस्था चालवली जाते. मात्र, तेथील कट ऑफ जास्त असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. त्यामुळे नव्या संस्थेतील दोन टक्के जागा व्यवसायाभिमुख प्रशिक्षणासाठी इच्छुक असलेल्या कँटोन्मेंटमधील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवल्या जाणार आहेत.
शिक्षक भरतीची प्रक्रिया
दरम्यान, या इन्स्टिट्यूटमध्ये वर्कशॉप उभारणीचे काम सुरू असून, प्रशिक्षणासाठी लागणार्या यंत्रांच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रियाही बोर्डाने राबवली आहे. त्यासाठी सुमारे अडीच ते तीन कोटींचा खर्च अपेक्षित असून, त्यानुसार अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय मान्यताप्राप्त कोर्सेस मनॅशनल कौन्सिल फॉर ट्रेनिंग इन द व्होकेशनल ट्रेड्सफकडे (एनसीटीव्हीटी) संलग्न करण्यासाठी अर्ज करण्यात आले असून, शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवली जात असल्याची माहिती बोर्ड प्रशासनाने दिली.