कंजरवाड्यात तरुणांना मारहाण ; चौघे एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव : रामनवमीच्या दिवशी झालेल्या भांडणाची तक्रार मागे न घेतल्याचा राग आल्यामुळे जमावाने मंगळवारी रात्री कंजरवाडा परीसरात चॉपर हल्ला केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर चौघा संशयीतांच्या एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी मुसक्या आवळल्या होत्या. संशयीतांना जळगाव न्यायालयात हजर केले असता 9 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

या आरोपींना अटक
पोलिसांनी ललित उमाकांत दीक्षित (23, रा.ईश्वर कॉलनी), बबलू हिरामण धनगर (21, रा.न्यू सम्राट कॉलनी), आकाश अजय सोनार (22, रा. लक्ष्मीनगर), अविनाश रामेश्वर राठोड (23, रा.रेणुकानगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. रामनवमीच्या दिवशी या चौघांचे कंजरवाड्यात राहणार्‍या बागडे बंधूंशी भांडण झाले होते. यावेळी त्यांनी पोलिसात तक्रार केली होती. ही तक्रार मागे घेण्याची मागणी करीत अनेक दिवसांपासून हे चौघे बागडे बंधूंना धमक्या देत होते. मंगळवारी रात्री 9.30 वाजता चौघे जण चॉपर, रॉड घेऊन कंजरवाड्यात शिरले. त्यांनी विक्की बागडे याच्या मांडीवर चॉपर मारुन दगडफेक केली त्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

अन्य पसार संशयीतांचा कसून शोध सुरू
चॉपरहल्ला, दगडफेक करणारे तरुण कांचननगर परीसरात लपून असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईच्या सूचना केल्या. त्यानुसार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रमेश अहिरे, सचिन मुंडे, रामकृष्ण पाटील, सुधीर साळवे, हेमंत कळसकर, नाना तायडे, किशोर पाटील, चंद्रकांत पाटील, मुकेश पाटील, गोविंदा पाटील, गणेश शिरसाळे यांच्या पथकाने बुधवारी चार संशयितांना अटक केली तर इतर बेपत्ता संशयितांचा पोलिस कसून शोध घेत आहे. दरम्यान, अटकेतील आरोपींना न्यायालयाने 9 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.