एकलग्न गावाजवळ अपघात ; अपघातानंतर चालक पसार, गावकर्यांचा रस्ता रोको
जळगाव- भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने वडील गंभीर जखमी झाले तर दुचाकीवर बसलेल्या माय-लेकींच्या अंगावरून कंटेनरचे चाक गेल्याने त्यांचा जागीच करुण अंत झाला. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता एकलग्न गावाजवळ हा अपघात झाला. या अपघातात संगीताबाई सुकदेव पाटील (43) व काजल सुकदेव पाटील (22, एकनाथनगर, रामेश्वर कॉलनी, जळगाव) या मायलेकी जागीच ठार झाल्या तर सुकदेव ओंकार पाटील (50) हे जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर चालक पसार झाल्यानंतर गावकर्यांनी काहीवेळ रस्ता रोखून धरल्याने महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या.
परतीच्या प्रवासात अपघात
सुकदेव पाटील हे पत्नी संगीताबाई व मुलगी काजल यांच्यासह पारोळा तालुक्यातील कामतवाडी येथे नातेवाईकांकडे गेले होते. मंगळवारी सकाळी जळगाव येथे येण्यासाठी निघाले असताना त्यांच्या दुचाकी (एम.एच.19 बी.डी.7857) ला अज्ञात कंटेनरने धडक दिली. मायलेकी रस्त्यावर पडल्याने व त्यांच्या डोक्यावरून कंटेनरचे चाक गेल्याने त्या जागीच गतप्राण झाल्या तर सुरक्षा रक्षक असलेले सुकदेव पाटील बाजूला फेकले गेले व त्यांनाही जबर मार लागला. अपघातानंतर मायलेकींचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.