वाकड : मालवाहतूक करणार्या कंटेनरखाली सापडून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात आज (गुरुवारी) दुपारी एकच्या सुमारास कात्रज-देहूरोड बायपास रोडवर भुमकरवस्ती भुयारी मार्गात झाला. याबाबतची माहिती अशी की, दुचाकीस्वार आणि कंटेनर (एम एच 06 / ए क्यू 5944) एकाच दिशेने हिंजवडी आयटी पार्ककडून डांगे चौकाकडे जात होते. भुमकरवस्ती भुयारी मार्गातून जात असताना वळणावर दुचाकीस्वार कंटेनरच्या मागच्या चाकाखाली सापडून ठार झाला. घटनेनंतर कंटेनरचालक स्वतः हिंजवडी पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. चालकाने घटनेची संपूर्ण माहिती हिंजवडी पोलिसांना दिली. दुचाकीस्वाराची ओळख अद्याप पटली नाही. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.