कंडारीतील तापी काठावर आढळले ठिपकेदार हरीण

0

वनविभागाच्या कर्मचार्‍यांकडून शोधमोहिम

भुसावळ- तालुक्यातील कंडारी येथील तापी नदी परीसरात गेल्या आठवड्यापासून ठिपकेदार हरीण आढळल्यानंतर वन विभागाने नुकतीच तापीकाठावर हरिणाची शोधमोहिम राबवली. वन विभागाचे कर्मचारी तुषार भोळे, विलास पाटील, शिवदास जाधव, अभिमान कोळी व शामराव भील यांनी या भागाची पाहणी केली. या पाहणीत हरणाच्या पायाचे ठसे व विष्ठाही आढळली.

पाण्याचा शोधार्थ वन्यप्राणी गावाकडे
गेल्या पंधरवड्यात हतनूर धरणातून आवर्तन नसल्याने तापी आटली होती तर बंधार्‍यांमध्येही अल्प पाणी असल्याने तापी खोर्‍यातील वन्य प्राण्यांची भटकंती होऊ लागली. याच कारणाने तापीकाठच्या गावांमध्ये वन्य प्राण्यांचा संचार सुरू झाला. गत आठवड्यापासून कंडारी गावातील तापी काठावरच्या भागातही ठिपकेदार हरिण आढळून आले. बर्‍याच लोकांना हे हरीण दिसल्याने गावात चर्चा सुरु झाली. गावाच्या तापीखोर्‍यात असलेल्या वीटभट्टी व्यावसायीकांनीही हरीणाचा वावर असल्याची बाब सांगितली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य डॉ. सूर्यभान पाटील, शामा मोरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी वन विभागाने गावकर्‍यांना हरीण किंवा वन्यप्राणी आढळल्यास संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.