सामाजिक कार्यकर्त्याच्या गांधीगिरीने खळबळ ; अवैध नळ कनेक्शनवर कारवाईची मागणी
भुसावळ- तालुक्यातील कंडारी गावात पाणीप्रश्न बिकट झाला असून हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंतीची वेळ आली. गावातील प्रभाग क्रमांक चारमध्ये सर्वाधिक पाणीप्रश्न बिकट झाल्याने सामाजिक कार्यकर्ते संजय मोरे यांनी थेट ग्रामसेवक दिलीप बारेला यांची ग्रामपंचायत कार्यालयात भेट घेवून त्यांची पूजा केल्याने खळबळ उडाली. प्रसंगी मोरे यांनी प्रभाग चारमध्ये अपूर्ण असलेल्या पाईप लाईनचे काम मार्गी लावण्यासह अवैध नळ कनेक्शन धारकांवर कारवाईची मागणी केली.
ग्रामसेवकांच्या पूजा व आरतीने खळबळ
गावात पाणीप्रश्न बिकट झाल्याने काही दिवसांपूर्वीच पंचायत समितीवर मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी प्रशासनाने ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी हा तिढा सोडवण्याचा सल्ला दिल्यानंतर अवैध कनेक्शन धारकांवर कारवाईचा निर्णय होवून प्रत्यक्षात कारवाई सुरूदेखील झाली मात्र अवघ्या 30 नळ कनेक्शन धारकांवर कारवाई झाली असलीतरी अद्याप शंभरवर अवैध नळ कनेक्शन कायम आहे. कारवाईसाठी खड्डे खोदण्यात आले असलेतरी कारवाईचा वेग संथ गतीने सुरू असल्याने मंगळवारी मोरे यांनी थेट ग्रामपंचायतीत ग्रामसेवकांची पूजा व आरती केल्याने खळबळ उडाली.