भुसावळात प्रभारी तहसीलदारांना दिले निवेदन : खुल्या भूखंडाची मागणी
भुसावळ- कंडारी गावातील बेघरवासी नागरीकांना घरकुले मंजूर झाली आहेत मात्र जागेअभावी घरकूल बांधणे अशक्य असल्याने बेघरवासीयांनी शासनाकडे खुल्या भुखंडाची मागणी केली आहे. यासाठी मंगळवारी प्रभारी तहसीलदारांना निवेदन देवून जिल्हाधिकार्यांना साकडे घालण्यात आले. शहरालगतच्या कंडारी गावातील एक हजार नागरीकांनी घरकुल योजनेतंर्गत घरकुलाची शासनाकडे मागणी केली होती. यापैकी केवळ 200 बेघरवासी नागरीकांना शासनाच्या घरकूल आवास योजनेतंर्गत घरकुले मंजूर झाली आहेत मात्र घरकूल मंजूर लाभार्थी नागरीकांकडे जागेचा अभाव असल्याने त्यांच्या समोर पेच निर्माण झाला आहे. यामुळे त्यांनी गावालगतच्या गट क्रमांक 230/1 मधील शासकीय भुखंडाची ग्रामपंचायतीकडे मागणी केली होती. त्यामुळे त्यांनी मागणी केल्यानुसार 31 मे 2018 च्या ग्रामसभेत ग्रामपंचायतीने ठराव सुद्धा केला आहे तसेच जागेची मागणी लवकर पुर्ण व्हावी यासाठी लाभार्थींनी मंगळवारी जिल्हाधिकारी यांना जागेबाबत साकडे घालून प्रभारी तहसीलदार संजय तायडे यांना निवेदन देण्यात आले. प्रांताधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनाही निवेदन देण्यात आले.
तहसीलदारांनी दिला सकारात्मक प्रतिसाद
बेघरवासीयांची मागणी रास्त असून त्यांना शासनाच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून देण्यासाठी वरीष्ठांकडे पाठपुरावा केला जाणार आहे. निश्चितच बेघरवासीयांना न्याय मिळेल असे, प्रभारी तहसीलदार संजय तायडे यांनी उपस्थितांना सांगितल्याने त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. सरजू तायडे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.