नागरीकांचे आरोग्य आले धोक्यात : ग्रामपंचायत प्रशासनाच्या बेफिकीने संताप
भुसावळ- शहरालगत असलेल्या कंडारी गावात ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. यामध्ये गटारी तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर पसरत असून रस्त्यावरही जागोजागी खड्डे निर्माण झाले आहे. परीणामी या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असून अस्वच्छतेने कळस गाठल्याने गावात डासांचा मोठ्या प्रमाणात प्रार्दुभाव वाढला आहे.इतकेच नव्हे तर गावाला जलशुद्धीकरण केंद्रावरून टीसीएलमुक्त पाण्याचा पाणीपुरवठा होत असल्याने नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे नागरीकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचे स्त्रोत असलेल्या विस्तारीत भागाकडेही दुर्लक्ष होत आहे. यामुळे प्रशासनाने त्वरीत दखल घेण्याची मागणी होत आहे.
ग्रामपंचायतीचे विकासकामांकडे दुर्लक्ष
शहरालगत असलेल्या कंडारी ग्रामपंचायतीचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला असून यामध्ये महामार्गालगतच्या सिद्धीविनायक कॉलनी, रांका नगर, सैनिक कॉलनी अशा विविध नगरासह सहकारी औद्योगिक वसाहतीचा समावेश होतो. यामुळे ग्रामपंचायतीला विविध शासकीय कर वसुलीतून उत्पन्न मिळते मात्र आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत असूनही ग्रामपंचायतीचे विकास कामांकडे दुर्लक्ष होत आहे. ग्रामपंचायतीच्या विस्तारीत भागात पाणीपुरवठ्याची व्यवस्था नसल्याने या भागात उन्हाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईची समस्या निर्माण होते. परीणामी या भागांमध्ये शासनाच्या टंचाईकृती आराखड्यातून टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येते.
डासांचा प्रादुर्भाव
गावातील गटारीतील सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने गटारीतील सांडपाणी रस्त्यावर पसरते. परीणामी दुर्गंधी सुटुन डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे नागरीकांसह लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे मात्र ग्रामपंचायतीचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे.
अस्वच्छतेचा कळस
गावात स्वच्छता अभियानातंर्गत केरकचरा संकलनासाठी कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत मात्र कचराकुंड्यांतून नियमीत कचरा संकलन केला जात नसल्याने कचराकुंड्या ‘ओव्हर र्फ्लोें होवून परीसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून त्याची दुर्गंधी परीसरातील नागरीकांना हानीकारक ठरत आहे तसेच गावात मोकाट गुरांचाही वावर वाढल्याने संताप व्यक्त होत आहे.
विहिरीलगतच शौचालयाचे बांधकाम
गावात तापी नदीवरील पाण्याची समस्या निर्माण झाल्यास ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरीवरून पाण्याचा पुरवठा केला जातो मात्र या विहिरीलगतच खाजगी शौचालयाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. यामुळे भविष्यात दुर्गंधीयुक्त पाण्याचा विहिरीत समावेश होवू शकतो.
मुरूम टाकण्याची मागणी
गावातील रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाल्याने या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचते. यामळे वाहन धारकांना व पादचार्यांना अडचणीवर मात करीत मार्गक्रमण करावे लागते. यासाठी ग्रामपंचायत सदस्य डॉ.सुर्यभान पाटील यांनी ग्रामविकास अधिकारी पी.टी.झोपे यांच्याकडे खड्डेमय रस्त्यावर मुरूम टाकण्याची मागणी केली आहे.