कंडारीत तणावपूर्ण शांतता ; अज्ञात जमावाविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा

0

किरकोळ कारणाचे पडसाद ; दगडफेकीनंतर जाळली बुलेट

भुसावळ- तालुक्यातील कंडारी येथे दुचाकीच्या उजेड चेहर्‍यावर पडल्यानंतर त्याचा जाब विचारल्याने दोघा युवकांमध्ये हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी रात्री 11 वाजता घडली होती तर त्यानंतर अज्ञात जमावाने भांडणाचा जाब विचारणार्‍या विशाल आत्माराम मोरे (27) यांच्या घराची तोडफोड करीत त्यांच्या आई सुमनबाई मोरे (59) यांना मारहाण केली होती. ही घटना ताजी असतानाच 23 रोजी रात्री कंडारी प्लॉटमधील मनोज बिअर बारसमोर संजय मुरलीधर मोरे यांच्या मालकिची बुलेट पेटवून दिल्याने गावात खळबळ उडाली तसेच या घटनेपूर्वी या भागात दगडफेकही झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या घटनेनंतर पोलिसांनी धाव घेत शांतता प्रस्थापीत केली. दरम्यान, गावात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला असून आरोपींची धरपकड सुरू करण्यात आली आहे.

बुलेट जाळल्याने 90 हजारांचे नुकसान
संजय मुरलीधर मोरे (नागसेन कॉलनी, कंडारी) यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार छत्रपती शिवाजी कॉम्प्लेक्ससमोर त्यांची बुलेट (एमएक्सक्यू 2852) लावली असताना 50 ते 60 जणांच्या अज्ञात जमावाने हातात लाठ्या-काठ्या, लोखंडी पाईप, दगड-विटा घेवून एकमेकांसमोर आले व संदीप सिंगारेचा भाचा गोलू (पूर्ण नाव, गाव माहित नाही) व त्याच्या साथीदारांनी बुलेट पेटवून दिल्याने सुमारे 90 हजारांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दरम्यान, कंडारीतील तणावाची स्थिती पाहता डीवायएसपी गजानन राठोड, शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक गंधाले यांच्यासह शहर पोलिसांनी धाव घेत जमाव पांगवला. या घटनेनंतर पोलिसांनी गावातून रूट मार्च केला.