कंडारी ग्रामस्थांचे महाराष्ट्र दिनी उपोषणास्त्र

1
पाणीपुरवठा योजना राबविण्यासह गावठाण जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्याची मागणी
भुसावळ:- पाणी टंचाईच्या समस्येने हैराण कंडारी ग्रामस्थांनी अखेर विविध मागण्यांसाठी एक मे महाराष्ट्रदिनापासून उपोषण पुकारणार असल्याचा इशारा दिला आहे. गावात नेहमीच पाणी टंचाईची समस्या भेडसावत असते. त्यामुळे नवीन पाणी पुरवठा योजना राबविण्यात यावी. वॉर्ड क्र.5 साठी दीपनगर केंद्राकडून पाणी पुरवठा करण्यात यावा. वार्ड क्र.2 व 3 मधील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करुन द्यावी. जिल्हा टंचाई निवारण कार्यकमांतर्गत मिळालेले वीज पंप व व्हाल बसविण्यात यावे. गावठाण व शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी, अशा विविध प्रलंबित मागण्यासांठी ग्रामस्थांतर्फे उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.
प्रस्ताव धुळखात 
ग्रामस्थांतर्फे उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे. यात नमूद मागण्यांमध्ये गावात सन 2008-09 पासून कंडारी ग्रामपंचायत नविन पाणीपुरवठा योजनेसाठी पाठपुरावा करीत असून त्यासाठी महाराष्ट्र जिवन प्राधिकरणनुसार सर्व बाबींची पुर्तता करुन सुध्दा नविन पाणीपुरवठा योजनेची मंजुरी मिळत नाही. या उलट तालुक्यातील इतर गावांनी प्रस्ताव सादर करताच त्यांना मंजुरी मिळून कामांना सुरवात झाली. परंतु नवीन योजनेचा प्रस्ताव गेल्या 10 वर्षापासून प्राधीकरणाकडे धुळखात पडून आहे. तसेच वार्ड क्र.5 साठी सुध्दा 2013 पासून दीपनगर केंद्राकडे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रा.पं., तालुका आणि जिल्हा प्रशासानकडून मागणी केली जात आहे.
घोषणेकडे दुर्लक्ष
उर्जामंत्री ना.चंद्रशेखर बानवकुळे यांनी भुसावळ व रावेर तालुक्यातील 9 गावांची पाणी पुरवठा योजना महानिर्मितीच्या माध्यमातून राबविण्याची घोषणा केली तरी देखील दीपनगर प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्याचप्रमाणे वार्ड क्र.2 व 3 मधील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. ग्रा.पं.1960 मध्ये विहिर खोदून गावाला पाणीपुरवठा केला होता. त्याच विहिरीतून आजही वार्ड क्र.2 व 3ला पिण्यासाठी पाणी पुरविले जात आहे. या विहिरीला पाणी फारच कमी आहे. त्यामुळे दोन्ही वार्डांना ते पुरत नाही.
जुन्या यंत्रणेवरच काम
सन 2016 मध्ये शासनाच्या जिल्हा टंचाई निवारण कृती आराखड्यातून पंचायतीला 20 अश्‍वशक्तीचे दोन 7.5 अश्‍वशक्तीचे दोन विज पंप, तसेच दोन मोठे व चार लहान व्हाल्व जिल्हा प्रशासनाकडून ग्रा.पंच्या मागणीनुसार पुरविण्यात आलेले आहे मात्र ते गेली दोन वर्षे धुळखात पडून आहे. तरी देखील जुन्या यंत्रणेवरच काम केले जात आहे. या निवेदनावर यशवंत चौधरी, सदस्य सुर्यभान पाटील, माधुरी पाटील, सविता मोरे, चंदन चौधरी, भुषण पाटील, शांताराम चौदरी, गोपाळ जेठवे, सरजु तायडे, प्रमोद कोळी, रमेश मोरे, नितीन मोरे, रविंद्र जेठवे, संदीप चौधरी यांसह ग्रामस्थांच्या स्वाक्षर्‍या आहेत.