कंत्राटी अधिकार्‍यांना मुदतवाढ देऊ नका

0

पीएमटी कामगार संघाची मागणी : आंदोलनाचा इशारा

पुणे : पीएमपीमधील कंत्राटी अधिकार्‍यांना कोणत्याही स्वरुपात मुदतवाढ देऊ नये. ती दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा पीएमटी कामगार संघाने (इंटक) दिला आहे. या अधिकार्‍यांपासून पीएमपीला कोणताही फायदा झालेला नाही, त्यामुळे निवृत्त होऊनही काही वर्षे झालेल्या व कंत्राटी स्वरुपात पीएमपीमध्ये नियुक्ती करून घेणार्‍या अधिकार्‍यांना तातडीने सेवामुक्त करावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.

संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र खराडे, नुरूद्दीन इनामदार यांनी याबाबत पीएमपीच्या अध्यक्षांना निवेदन दिले आहे. पीएमपी स्थापन झाल्यानंतर अद्यापपर्यंत आस्थापना आराखडा मंजूर झालेला नाही. मध्यंतरी करण्यात आलेला आराखडा रद्द करण्यात आला आहे. त्यानुसार नियुक्त केलेले निवृत्त अधिकारीही सेवामुक्त करायला हवेत. त्यांच्यापासून पीएमपीला फायदा व्हावा म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता त्यांना मुदतवाढ देण्याचा घाट घातला जात आहे. संघटना ते सहन करणार नाही, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

अधिकार्‍यांना सेवामुक्त करा

कंत्राटी पद्धतीने घेतलेल्या या अधिकार्‍यांना पीएमपीमधील सर्व महत्त्वाची पदे दिली आहेत. कामगारांना अहितकारक निर्णय घेण्याशिवाय त्यांच्याकडून काहीही होत नाही. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाचे नियम डावलून त्यांना सेवेत घेतले गेले. वयामुळे त्यांची कार्यक्षमता कमी झाली आहे. त्यांच्या भरमसाट वेतनाचे ओझे विनाकारण पीएमपीवर पडते आहे. आधीच तोट्यात असलेल्या पीएमपीवर हा भार टाकण्यात आला आहे. त्यामुळे या अधिकार्‍यांना त्वरित सेवामुक्त करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.