कंपनीचे स्थलांतर रोखण्यासाठी कामगारांचे चक्री उपोषण

0

‘त्यांनी’ भविष्यासाठी सणाच्या आनंदावर सोडले पाणी

हिंद कामगार संघटनेच्या माध्यमातून आंदोलन सुरू

पिंपरी-चिंचवड : दिवाळी सारखा मोठा सण शहरात ठिकठिकाणी आनंदात साजरा केला गेला. गोरगरीबांपासून ते रस्त्यांवरील मुलांपर्यंत सर्वांना फराळाचे वाटप सामाजिक संस्थांमार्फत करण्यात आला. अगदी जळीतग्रस्तांना मदत करून त्यांचीही दिवाळी आनंदात गेली. मात्र शहरातील सर्वात जुन्या आणि महत्वाच्या असणार्‍या दाईची कंपनीतील कामगारांची दिवाळी रस्त्यावर होती. ना काही सण, ना काही आनंद. दाईची कंपनीच्या कामगारांचे गेल्या दीड महिन्यापूसन आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. कंपनीच्या स्थलांतरणाविरोधात कामगारांचे गेल्या दीड महिन्यांपासून चक्री उपोषण सुरु आहे. कंपनीचे स्थलांतर करू नये, या मागणीसाठी कामगारांनी उपोषण सुरू केले आहे. आपल्या भविष्यासाठी सणाच्या आनंदावर पाणी सोडले आहे. हिंद कामगार संघटनेच्या माध्यमातून संघटनेचे अध्यक्ष कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली कामगार आपल्या न्याय हक्कांसाठी विविध पातळीवर लढत आहेत.

गुजराथमध्ये होणार स्थलांतर

मागील काही दिवसांपासून कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना व कामगार संघटनेला पूर्णत: अंधारात ठेवून अचानकपणे कंपनी गुजरात येथे स्थलांतरीत करण्यास सुरुवात केली आहे. याविरोधात हिंद कामगार संघटनेने न्यायालयाकडून स्थगिती आदेश मिळविला आहे. मात्र, तरीही स्थलांतरण सुरु असल्याने त्याला विरोध दर्शविण्यासाठी तसेच कर्मचार्‍यांच्या विविध प्रलंबित प्रश्‍नांबाबत कंपनी व्यवस्थापन, श्रम मंत्रालय व कामगार आयुक्तांचे लक्ष वेधण्यासाठी चक्री उपोषण सुरु आहे. दिवाळी संपत आली तरी कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना नियमानुसार वीस टक्के बोनस दिला नाही. त्यातच ऐन दिवाळीत आंदोलन सुरु असतानाही व्यवस्थापनाने त्याची दखल न घेतल्याने कामगारांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

आठवडाभरात होणार बैठक

हिंद कामगार संघटनेचे अध्यक्ष कदम म्हणाले की, कंपनी स्थलांतरीत करण्याचे हे काम त्वरित थांबवावे. आतापर्यंत या कंपनीतून बाहेर पाठविण्यात आलेली मशिनरी पुन्हा कंपनीत आणून उत्पादन सुरु करावे, या मागणीसाठी ऐन दिवाळीतही कामगारांनी आंदोलन सुरुच ठेवले आहे. दाई-ईची कंपनी व्यवस्थापनाने चर्चेची तयारी दाखविली आहे. त्यानुसार येत्या आठवडाभरात बैठक होणार आहे. या बैठकीकडून कामगारांना मोठ्या अपेक्षा आहेत.