मुंबई । कचरा वर्गीकरण करण्यात टाळाटाळ करणार्या मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्या, हॉटेल्सवर पालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील 249 गृहनिर्माण सोसायट्या, हॉटेल्स आदींविरुद्ध कायदेशीर करण्यात आली आहे तसेच 122 जणांवर एमआरटीपी कायद्यानुसार नोटीस बजावण्यात आली आहे. मुंबईतील 20 हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर उभ्या असलेल्या, तसेच प्रतिदिन 100 किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण होत असलेल्या गृहनिर्माण सोसायट्या, हॉटेल्स, मॉल्स आदींना कचर्याचे वर्गीकरण आणि ओल्या कचर्यापासून खतनिर्मिती बंधनकारक करण्यात आली आहे. पालिका मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या उपायुक्त, साहाय्यक आयुक्तांच्या मासिक बैठकीमध्ये पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी कचरा वर्गीकरणाचा आढावा घेतला.
कचरा वर्गीकरण करण्यास स्वारस्य नसलेल्या तीन हजार 376 सोसायट्या, हॉटेल्स आदींवर पालिकेने नोटीस बजावली होती. त्यापैकी 538 जणांनी कचरा वर्गीकरण करण्यास सुरुवात केली, तर एक हजार 320 जणांनी कचरा वर्गीकरण करण्यास मुदत द्यावी, अशी विनंती पालिकेला केली आहे. मात्र, 249 जणांनी कोणतीच कार्यवाही न केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध मुंबई महापालिका अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.