पिंपरी ः प्रतिनिधी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोला आग लागल्यानंतर कचरा वर्गीकरणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागरिक ओला, सुका आणि घातक कचरा वेगळा करुन देत नाहीत. एकत्रित दिलेला कचरा कचरा डेपोमध्ये वेगळा करण्याकडे दुर्लक्ष केले जाते. आधी नागरिक आणि त्यानंतर कर्मचार्यांच्या हलगर्जीपणामुळे अशा दुर्घटना घडत आहेत. त्यामुळे कचरा डेपोला आग लागण्यासारख्या घटना घडतात. त्यातून शहराच्या प्रदूषणात भर देखील पडत आहे. त्यासाठी नागरिकांनी आणि पालिका प्रशासनाने पुढाकार घेऊन कचरा वर्गीकरण करुन त्याचे विघटन करणे गरजेचे आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपोमधील सॅनिटरी लॅन्डमधील टप्पा – 1 येथे गेल्या सहा ते सात वर्षांपासून टाकलेल्या प्रक्रिया केलेल्या कचर्याला गुरुवारी सायंकाळी आग लागली आहे. ही आग 24 तास होत आले, तरी धुमसत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या घटनेमुळे कचरा वर्गीकरणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
* ओल्या कचर्यापासून कंपोस्ट खत
घरा-घरातून तयार होणारा ओला व सुका कचरा वेगळा करून दिला जात नाही. त्यामुळे मोठी समस्या होते आहे. या ओल्या कचर्यापासून खत तयार करता येते. स्वयंपाक घरातील निघणारा कचरा कचरा गाडीत न टाकता, त्यापासून उत्तमप्रकारचे कंपोस्टखत तयार करता येते. यासाठी पिंपरी-चिंचवडमधील रोझलँड सोसायटीने पुढाकार घेतला असून सोसायटीतील प्रत्येक घराच्या स्वयंपाक घरातून निघणारा कचर्याचे कंपोस्ट खत तयार केले जाते. या खताचा दुहेरी फायदा होतो. एक म्हणेज सोसायटीतील झाडांसाठी ते खत वापरता येऊ शकते आणि मोठ्या प्रमाणात खत तयार झाल्यास त्या खताची विक्री करुन सोसायट्यांना आर्थिक फायदा देखील मिळू शकतो.
* कचर्याच्या वर्गीकरणाची गरज
याबाबत बोलताना रोझलँड सोसायटीचे सिध्दार्थ नाईक म्हणाले की, कचर्याचे वर्गीकरण करण्याशिवाय पर्याय नाही. कचरर्याची समस्या दिवसें-दिवस वाढत चालली आहे. त्यासाठी शहरातील सोसायट्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. नागरिकांना ओला, सुका आणि घरगुती घातक कचरा वेगळा करुन दिल्यास पालिकेला त्याचे योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यास मोठी मदत होईल. नागरिकांनी कचरा वेगळा करुन न दिल्यास पालिकेने कचरा स्वीकारु नये, याबाबत कठोर नियमावली तयार करुन अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच सोसायट्यांनी कंपोस्ट खत प्रकल्प राबवावेत. यामुळे कचरा डेपोवर ताण येणार नाही. तिकडे जाणारा कचर्याचे प्रमाण कमी होईल. प्लॉस्टिक पिशवीतील कचरा स्वीकारु नये. प्लॉस्टिक पिशवीतील कचर्यामुळे पिशवीत घातक ‘मिथेन’ वायू तयार होतो. यामुळे कचरा डेपोला आग लागण्याच्या घटना घडतात.