पिंपरी-चिंचवड : महापालिका क्षेत्रात कचरा व्यवस्थापन विस्कळीत झाल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. ही सारी परिस्थिती लक्षात घेता, मुंबई महापालिकेच्या धर्तीवर कचरा व्यवस्थापनाचे संपूर्ण काम खासगी संस्थेला देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेण्यात आला आहे. एकाच संस्थेला कचरा व्यवस्थापनाचे काम दिले, तर शहरातील कचर्याचे व्यवस्थापन करणे शक्य होईल, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे.
खासगी संस्थांवर नियंत्रण मिळवणे अवघड
महापालिका क्षेत्रात कचरा गोळा करण्याचे काम विविध सेवाभावी संस्थांना दिले आहे. मात्र, संबंधित संस्था कचर्याचे व्यवस्थापन व्यवस्थित करीत नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. शिवाय हे काम खासगी संस्थेला ठेकेदारीने पद्धतीने दिले असल्याने त्यावर नियंत्रण करणे अवघड बनले आहे. मुंबई महापालिकेत कचरा व्यवस्थापनाचे काम खासगी संस्थेतर्फे केले जाते. कचरा गोळा करणे आणि तो कचरा डेपोपर्यंत पोहोचविणे आदी कामे खासगी संस्थेतर्फे केली जातात. एकच संस्था काम करीत असेल, तर नियंत्रण ठेवणे शक्य होते. तक्रारींचे निवारण करणे शक्य होते. मात्र, सध्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे या कामाचे आऊटसोर्सिंग करण्याचा विचार आहे, असेही आयुक्त वाघमारे म्हणाले.
जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट
आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले, महापालिका क्षेत्रातील जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार असून, यासाठी अभियंत्यांचे पॅनेल तयार केले जाणार आहे. शहरातील इमारतींची पाहणी करून त्या धोकादायक इमारती काढून टाकल्या जाणार आहेत. तसेच महापालिकेचा अर्थसंकल्प स्थायी समितीने सर्वसाधारण सभेकडे मार्चअखेरीपर्यंत देणे आवश्यक आहे. मात्र, स्थायी समिती अस्तित्वात नव्हती. त्यामुळे प्रशासनाने अर्थसंकल्प तयार करून त्यानुसार कार्यवाही सुरू केली आहे. नवीन समिती आल्यानंतर चर्चा आणि बदलांसाठी वाव आहे. शिक्षण मंडळाचा पुढील वर्षीचा अर्थसंकल्प, महापालिका अर्थसंकल्पातच आहे, असे आयुक्तांनी सांगितले.