कचर्‍याच्या प्रश्नी मुंबई पालिका अद्याप नियोजनशुन्य

0

मुंबई : मुंबईतील कचरा उचलण्याची जबाबदारी असताना पालिकेने 20 हजार चौ.मी.चटईक्षेत्र असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांमधील कचरा 2 ऑक्टोबरपासून उचलणार नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र यासाठी पालिका प्रशासनाने अद्याप कोणतेही नियोजन केलेले नसून गृहनिर्माण सोसायट्यांना सहकार्यही केलेले नाही. त्यामुळे अचानक कचरा न उचलण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी केल्यास मोठी गैरसोय होणार आहे. या हलगर्जी कारभाराविरोधात शिवसेनेने स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले होते. मुलुंड, देवनारसारख्या डंपिंग ग्राऊंडची क्षमता संपुष्टात येत असल्यामुळे कचरा कुठे टाकणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने 20 हजार चौरस मीटर किंवा त्यापेक्षा अधिक चटईक्षेत्र असलेल्या सोसायट्यांना नोटिसा पाठवल्या असून, आपल्या कचर्यांची विल्हेवाट आपल्याच परिसरात लावण्याचे निर्देश दिले आहेत.

शिवसेनेच्या राजूल पटेल सरसावल्या
2 ऑक्टोबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. मात्र या निर्णय लागू होण्यास फक्त दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना पालिका प्रशासनाकडून सोसायट्यांना कोणतेही मार्गदर्शन करण्यात आलेले नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या राजूल पटेल यांनी हरकतीचा मुद्दा मांडून सोसायटींची बाजू मांडली. अनेक सोसायट्यांमध्ये पुरेशी जागा उपलब्ध नाही. सोसायट्यांनी कचरा कुठे टाकावा याबाबत मार्गदर्शन केलेले नाही. त्यामुळे या निर्णयाच्या अंमलबजावणीनंतर गोंधळ उडणार असल्याचे राजूल पटेल यावेळी म्हणाल्या.

प्रशासनाला आपली भूमिका मांडावी लागणार
या हरकतीच्या मुद्द्याला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिला. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी हरकतीचा मुद्दा राखून ठेवल्याचे जाहीर केले. त्यामुळे यावर प्रशासनाला आपली भूमिका मांडावी लागणार आहे. डबे उचलले जातात, मात्र कचरा तिथेच पालिका प्रशासनाने आपल्या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणांवरचे कचर्यांचे डबे उचलले आहेत. त्यामुळे नागरिक उघड्यावर कचरा टाकत आहेत. त्यामुळे निर्माण झालेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.