कच्या मालात वाढ झाल्याने गणपतीबाप्पाची मुर्ती झाली महाग

0
शिरगाव : गणपती उत्सव म्हटले  कि संपूर्ण पुणे जिल्ह्यात जणू आनंदाला उधाण येत असते काही महिने आधीपासूनच आम्ही मूर्तिकार मूर्ती करण्याची लगबग सुरु असायची. सध्या गणेशभक्तांचा कल हा दिसायला आकर्षक मूर्ती घेण्याकडे आहे. त्यामुळे आम्ही मूर्तिकारही मागणी नुसारच मूर्ती बनवणे पसंत करतो. सध्या रंग आणि झगमगाट असणार्‍या मूर्तींना जास्त मागणी आहे. या मूर्ती बनवण्यासाठी अगदी कमी वेळ लागतो त्यामुळे मूर्तिकारही याच मूर्ती बनवणे पसंद करतात.
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि चित्ताकर्षक रंगसंगती यामुळे परंपरागत मूर्ती घेण्यामागचा लोकांचा कल कमी झाला आहे. जर का भविष्यात हा कल वाढला नाही तर परंपरागत मूर्ती कला बंद होईल, अशी भीती गहुंजे येथील मूर्तिकार संदीप कुंभार यांनी व्यक्त केली.
संदीप कुंभार पुढे म्हणाले की, मी दरवर्षी 1800 ते 2000 मूर्ती तयार करून विकतो. यापैकी अवघ्या बोटावर मोजण्या इतक्या मूर्ती पर्यावरणाला पूरक आणि पूर्णपणे पाण्यात विरघळून जाणार्‍या असतात. आज आपण बाजारात मिळणार्‍या मूर्ती पहिल्या तर त्या पटकन कोणीही विकत घेतील अशा असतात. परंतु त्यांचा परंपरेशी काहीच सबंध नसल्याने त्याचा उपयोग होत नाही. शिवाय त्या मूर्ती बनवणार्‍याचा आणि कलेचा दुरान्वयेही संबंध नाही. पी.ओ.पी. पाण्यात भिजवले आणि साच्यात टाकले की मूर्ती तयार. एक दिवस वाळली ही लगेच रंग देवून ती मूर्ती विक्रीसाठी तयार होते. परंतु शाडूच्या मातीची मूर्ती तयार करताना साधारण मूर्तीपेक्षा सुमारे दहा पट जास्त मेहनत, वेळ आणि पैसेसुद्धा लागतात. इतके करूनही त्या विकल्या जात नाहीत हीच मोठी खंत आहे. परंतु याचा थेट परिणाम हस्तकलेवर होतोय. रेडीमेड असल्यावर कलाकारांना जीव ओतून काम करावे लागत नाही. स्वतःचे कसब दाखवण्याची गरज नाही, कारण एक साचा बनवला कीत्यात हजारो मूर्ती करता येतात. त्यामुळे एक दिवस हाताने बनवलेल्या मूर्ती कोणीच घेणार नाही आणि ही कला बंद होईल अशी भीती वाटते.
आता काळात मूर्ती बनविणे ही फक्त कुंभारांचीच मक्तेदारी राहिली नाही. तर कोणीही या व्यवसायात शिरकाव करू पाहत आहे. अगदी परप्रांतीयसुद्धा मूर्ती तयार करताहेत. येणार्‍या नविन पिढीने या व्यवसायाकडे परंपरागत व्यवसाय म्हणून पाहावे, अन्यथा समाधान मिळणार नाही. आम्ही जवळपास 2 हजार मूर्ती विकतो, परंतु यावर्षी कच्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने 1500 ते 1800 मूर्ती विकतील असा अंदाज आहे. आजपर्यंत 1 हजार मूर्ती गेल्या आहेत. कच्चा माल म्हणजे रंग, प्लास्टर ऑफ पॅरीस, दळणवळण खर्च आणि जीएसटी वाढले आहेत. त्याचा परिणाम मूर्तीच्या किमतीवर होणार आहे. मागील वर्षी घरगुती गणेश मूर्ती 200 पासून ते 3000 रुपयांपर्यंत आम्ही विकल्या. यावर्षी त्या तयार करण्यासाठीच एव्हडा खर्च आला आहे. नंतर जीएसटी कमी झाला परंतु आम्ही सर्व माल त्यापूर्वीच खरेदी करून ठेवला होता. कारण अचानक कमी पडला तर पंचाईत होते. यावर्षी घरगुती परंतु मोठ्या मूर्तींना चांगली मागणी असल्याचे कुंभार यांनी सांगितले.
कुंभार यांनी सांगितले की, त्यांचा हा पिढीजात व्यवसाय आहे. त्यांचे वडील कोंडीबा कुंभार हा व्यवसाय करायचे. त्यांचा हा पिढीजात व्यवसाय आहे. परंपरा आणि तंत्रज्ञान याचा योग्य मिलाप आम्ही घातला आहे. त्यामुळे उत्पादन दुप्पट झाले आहे. आम्ही रंग देण्यासाठी अत्याधुनिक प्रकारच्या स्प्रेगन वापरतो. त्यामुळे रंग वाया जात नाही आणि महत्वाचे म्हणजे रंग अतिशय चांगला देता येतो. त्यामुळे मूर्तीची आकर्षकता वाढते. आमचे वडील सर्व मूर्तींना हाताने रंग द्यायचे. त्यामुळे वर्षभरात 400 ते 500 मूर्तीच करता यायच्या. आता हा वेग जवळ जवळ दुप्पट झाल्याने सुमारे 2000 मूर्ती आम्ही बनवतो. या मूर्ती बनवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण घेतले नाही. माझ्या मुलांनाही दिले नाही. तरी ते चांगल्या मूर्ती बनवतात. आता नवीन पिढीही या व्यावसायात चांगली रमताना दिसते आहे. माझी दोन्हीही मुले मूर्ती तयार करतात. चांगल्या प्रकारे रंगही देतात. त्यामुळे हे काम आम्ही सर्वजण मोठ्या आनंदाने करतो. माझ्या कुटुंबातील आठजण या व्यवसायात आहेत. त्यामुळे भविष्यात हा व्यवसाय आणखी जास्त फुलेल यात शंका नाही.
हा व्यवसाय कुंभारांचा पिढीजात असल्याने पुढच्या पिढीने तो स्वीकारायला हरकत नाह. परंतु नवीन पिढी या व्यवसायाकडे कानाडोळा करताना दिसून येते. हा व्यवसाय सोडून कंपनीत काम करण्यासाठी उत्सुकता दाखवताना ही मुले दिसल्यावर वाईट वाटते. महाराष्ट्रातील कुंभारांनीच याकडे दुर्लक्ष केल्याने परप्रांतीय याकडे वळू लागले आहेत. ज्यांना कोणत्याही प्रकारची पाश्‍वभूमी नाही कलेचा वारसा नाही, ते लोक हा व्यवसाय करतात. त्यामुळे कुंभारांच्या या व्यवसायावर गदा येण्याची शक्यता आहे. ज्यांची भाषा मराठी नसताना ते हा व्यवसाय करू शकतात मग कुंभार लोकांनी करण्यास काय हरकत आहे? शिवाय यात अर्थार्जनही चांगल्या प्रकारे आहे. त्यामुळे येणार्‍या नवीन पिढ्यांनी हा परंपरागत व्यवसाय कला म्हणून पहिला तरी त्यांच्या भाषेत यात करिअर करता येयील.