खंडवा-भुसावळ सेक्शनमध्ये होणार तांत्रिक कामे
भुसावळ- मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील खंडवा-भुसावळ सेक्शनमध्ये खंडवा यार्ड आणि बगमार-डोंगरगाव स्टेशन दरम्यान इंजिनिअरींगचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतल्याने भुसावळ-कटनी (डाऊन 51187) व भुसावळ-इटारसी पॅसेंजर या गाड्या शनिवार, 8 जूनपासून अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आल्याने रेल्वे प्रवाशांसह चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होणार आहेत. यासोबतच 11 जूनपासून अप कटनी-भुसावळ पॅसेंजर व अप इटारसी-भुसावळ पॅसेंजर 10 जून रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे
प्रवाशांमधून तीव्र संताप
दोन्ही बाजूच्या दोन्ही पॅसेंजर गाड्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. रेल्वे प्रशासनाचे देखभाल-दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर तत्काळ दोन्ही पॅसेंजर गाड्या सुरू केल्या जातील, असे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे. दोन महिन्यांपुर्वीही या मार्गावरील ब्लॉकमुळे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. आता पुन्हा ब्लॉक घेतला जात असल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे. रेल्वे प्रशासनाने ब्लॉक घेतल्यानंतर सर्व कामे एकाचवेळी पूर्ण करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रेल्वे प्रशासनाने आता ऐन शाळा, महाविद्यालये सुरू होण्याच्या काळातच दोन्ही पॅसेंजर गाड्या रद्द केल्याने विद्यार्थ्यांचे आणि प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होणार आहे. लहान रेल्वे स्थानकांवर एक्स्प्रेस, मेल गाड्या थांबत नसल्याने प्रवाशांना आर्थिक फटका बसणार आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेला ब्लॉक अनिश्चित स्वरूपाचा असल्याने विद्यार्थ्यांची अप-डाऊनची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होणार आहे. भुसावळ येथून नोकरीनिमित्त अनेक जण बर्हाणपूरपर्यंत अपडाऊन करतात. त्यांनाही रेल्वेच्या निर्णयाचा फटका बसणार आहे.