चाकूच्या धाकावर यावलच्या सराफाला लुटले

0

सहा लाखांचा मुद्देमाल लंपास ; तीन संशयीताना पोलिसांकडून अटक

यावल- भुसावळ रस्त्याला लागुन असलेल्या श्री स्वामी समर्थ नगरात एका सराफा व्यावसायीकावर तिघांनी चाकूने हल्ला करीत त्याच्याजवळील रोख रक्कमेसह सुमारे सहा लाखांचा मुद्देमाल असलेली बॅग लांबवल्याची घटना शनिवारी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास घडली होती. या घटनेत सराफा व्यावसायीक जखमी झाला असून त्यांनी आरडा-ओरड केल्यावर जमावाने एकत्रीत येत एका संशयीतास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते तर रविवारी अन्य दोन संशयीतांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेला मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पाळत ठेवून केली लूट
शहरातील मुख्य रस्त्यावर समर्थ ज्वेलर्स हे श्रीनिवास नंदकिशोर महालकर यांचे सोने-चांदी दागिने विक्रीचे दुकान असून ते रहायला भुसावळ रस्त्याला लागुन टेलीफोन ऑफीसजवळील श्री स्वामी समर्थ नगरात वास्तव्यास आहे. शनिवारी रात्री आठ वाजता त्यांनी दुकान बंद करीत दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा सुमारे सहा लाखांचा मुद्देमाल घेवून दुचाकीव्दारे घरी निघाले असतानाच सव्वा आठ वाजेच्या सुमारास त्यांच्या घराजवळ तोंडाला रूमाल बांधलेल्या तिघा संशयीतांनी त्यांच्यावर चाकुने उजव्या हातावर वार केला. अचानक हल्ला झाल्याने सराफ भांबावले व या गडगडीत चोरट्यांनी त्यांच्या हातातील बॅग हिसकावून पळ काढला. या प्रकारानंतर सराफाने आरडा-ओरड केल्याने नागरीकांनी धाव घेतली. विनोद घारू, भुषण चौधरी, प्रविण बडगुजर, अतुल बडगुजर, शाहरूख तडवी यांनी एका संशयीतास पकडले तर दोघा संशयीताचा पाठलाग केला मात्र तो पर्यंत चोरटे पसार झाले. घटनास्थळावरून हवालदार प्रमोद लोणे, राहुल चौधरी यांनी संशयीत आकाश सुरेश सपकाळे (24, रा.जळगाव) यास पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्यास अटक करण्यात आली. पोलिस निरीक्षक डी.के.परदेशी, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुजित ठाकरे, गोरख पाटील, संजय पाटील, संजीव चौधरी, जाकीर शेख यांनी घटनास्थळी जावून चाकु हस्तगत केला. जखमी महालकर यांच्यावर उपचार सुरू आहेत.

तिघांना पोलिसांकडून अटक
पकडण्यात आलेल्या संशयीताने यावल शहरातील बोरावल गेट भागातील गोलू याने आम्हाला या सराफा व्यावसायीकाची दागिने व रोख रक्कम घेवून दररोजच्या ये-जा संदर्भात टीप दिल्याची माहिती पोलिसांना दिली तर अटकेतील आकाश सपकाळेची चौकशी केल्यानंतर त्याने या गुन्ह्यात चेतन गंगाधर कोळी (28, जैनाबाद, जळगाव) व गौरव कुंवर यांचा सहभाग असल्याची माहिती दिल्यावरून दोघांना रविवारी अटक करण्यात आली. दरम्यान चेतन हा यावलमध्ये आपल्या सुंदरनगरीतील रहिवासी असलेल्या आत्याकडे आला होता व त्यानेच या गुन्ह्याचा कट रचल्याचे उघडकीस आले. या गुन्ह्यात अद्याप गोलू पसार असून त्याचा कसून शोध सुरू आहे.