जळगाव । राष्ट्रीय महामार्ग क्रं.6 वरील मानराज पार्कजवळ बांभोरीकडे जात असलेल्या ट्रकचा दुचाकीला कट लागल्याने दुचाकीस्वाराने भर रस्त्यातच ट्रक अडवून चालकास बेदम मारहाण करून जमावाच्या मदतीने ट्रकच्या काचा फोडून नुकसान केले. यानंतर जखमी ट्रकचालकास जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले होते. दुपारी रामानंदनगर पोलिस स्टेशन गाठत चालकाने मारहाण करणार्या दुचाकीस्वाराविरूध्द तक्रार दाखल केली आहे.
ट्रक चालकाशी वाद घालून केली मारहाण
ट्रकचालक मुस्तफा खान जहांगीर खान (रा.धरणगावं) हा धरणगांव येथून ट्रक (क्रं.एम.एच.18.एम.3723 ) ट्रक घेवून बांभोरी येथील जैन इरिगेशन कंपनीत जात होता. दुपारी 1 वाजेच्या सुमारास मानराज पार्कजवळून जात असतांना समोरून दुसर्या वाहनाला ओव्हर टेक करून शिवकॉलनीकडे जात असलेल्या दुचाकीला ट्रकचा कट लागला. त्यानंतर दुचाकीस्वार तरूणाने दुचाकी वळवून ट्रक अडविला आणि चालकाशी वाद घालत मारहाण करण्यास सुरूवात केली.
ट्रकच्या काचा फोडल्या
यावेळी त्या ठिकाणी जमाव जमल्याने जमावाने चालकास चोप देण्यास सुरूवात केली. काहींनी ट्रकवर दगडफेक करून काचा फोडल्या. यात ट्रकचे नुकसान झाले. चालक मुस्तफा गंभीर जखमी झाल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दुपारी 2 वाजता मुस्तफा याने रामानंदनगर पोलिस स्टेशन गाठत दुचाकीस्वार तरूणाविरूध्द तक्रार दिली. दरम्यान, त्या तरूणास ट्रकचा कटच लागला नसून समोरून येत असल्याने त्याला फक्त हातच दाखवल्याने त्याचाच चुकीचा अर्थ धरून त्याने मारहाण केल्याचा मुस्तफा याने सांगितले.