राष्ट्रपतींनीही फटकारले : आपण कोणता समाज घडवित आहोत?
लहान मुलांचे हास्य ही जगातील सर्वोत्तम उपलब्धी : राष्ट्रपती
काकरियल : देशाच्या स्वातंत्र्याला 70 वर्षे झाली तरीही देशाच्या कुठल्याही भागात कठुआ अत्याचारासारखी घटना घडणे ही बाब अत्यंत लज्जास्पद आहे; आपण कोणता समाज घडवित आहोत, अशा शब्दांत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संबंधित यंत्रणांसह नराधमांना फटकारले. लहान मुलांचे हास्य ही सर्वात मोठी उपलब्धी असते. तेव्हा वैष्णोदेवीच्या भूमीत झालेल्या अत्याचाराने देशाच्या प्रतिमेला धक्का बसला आहे, असा संतापही राष्ट्रपतींनी व्यक्त केला. कोणत्याही राज्यात अशा घटना घडू नयेत, बालकांची सुरक्षा ही राज्यांची महत्वपूर्ण जबाबदारी आहे, असेही त्यांनी सांगितले. माता वैष्णोदेवी विद्यापीठाच्या सहाव्या दीक्षान्त समारंभात राष्ट्रपती कोविंद संबोधित करत होते. यावेळी त्यांनी कठुआ घटनेवर भाष्य केले. जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्तीदेखील यावेळी उपस्थित होत्या.
‘सुवर्ण’भरारी घेणार्या महिला खेळाडुंचे कौतुक
जम्मू-काश्मीरच्या कठुआ येथील बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देशात तीव्र प्रतिक्रिया उमटलेल्या असतानाच, राष्ट्रपतींनीही त्यावर भाष्य केल्याने राज्य व केंद्र सरकारला जोरदार फटकार बसली आहे. राष्ट्रपती म्हणाले, की आपल्याला विचार करावा लागणार आहे, की आपण कुठल्या प्रकारचा समाज विकसित करत आहोत. कुठल्याही महिलेवर किंवा बालिकेसोबत असे प्रकार घडू नये, ही राज्यांची जबाबदारी आहे. या जगातील सर्वात सुंदर बाब म्हणजे एखाद्या चिमुकलीच्या चेहर्यावरील हास्य होय. त्यामुळे आपली जबाबदारी आहे, की या निष्पापांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून दिले पाहिजे. मात्र देशातील अनेक भागात अनेक निष्पाप मुलींना अशा दुर्देवी घटनांचा सामना करावा लागतो, ही खूपच लाज आणणारी बाब आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारताच्या मुलींनी देशाचे नाव उंचावल्याबद्दल त्यांचे कौतुकही केले. दिल्लीची मणिका बत्रा, मणिपूरची मेरी कोम, मीराबाई चानू, संगिता चानू, हरियाणाची मनू भोकर, विनिश फोगाट, तेलंगणाची सायना नेहवाल, पंजाबची हिना सिद्धू या महिला खेळाडूंचे राष्ट्रपतींनी खास कौतुक केले. या मुलींनी भारताचे नाव जगात उंचाविले, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. यावेळी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनीही विचार व्यक्त केले. त्या म्हणाल्या, माता वैष्णोदेवीच्या भूमित, देवीचीच अभिव्यक्ती असणार्या इतक्या लहान मुलीसोबत इतकी क्रूर बाब कोण करू शकतो, आपल्या समाजात काहीतरी गडबड असल्यानेच हा प्रकार घडला आहे, असेही त्यांनी सांगितले.
उच्च न्यायालयाचा माध्यमांना दणका
कठुआमध्ये 8 वर्षीय चिमुकलीवर सामूहिक आत्याचार झाल्यानंतर तिचा निर्घूण खून करण्यात आला. या घटनेतील पीडित मुलीची ओळख ज्या माध्यमांमुळे उघड झाली त्या माध्यमांना दिल्ली उच्च न्यायालयाने 10 लाखांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. यामध्ये न्यायालयाने या माध्यमांची यादी तयार करून संबंधित विषयावर नोटिसा पाठवल्या आहेत. न्यायालयाने दिलेल्या नोटिसीमध्ये, ज्या माध्यमांनी घटनेतील पीडितेची ओळख उघड केली अशा माध्यमांनी 10 लाखांचा दंड न्यायालयाकडे जमा करायचा आहे, त्यानंतर जमा झालेल्या निधीची रक्कम ही जम्मू-काश्मीरच्या नागरी सहाय्यता निधीकडे सुपूर्त करण्यात येईल, असे म्हटले आहे. महिलांच्या बाबतीत घडणर्या अशा गुन्ह्यांविषयीचे वृत्तांकन करताना पीडित महिलांची, मुलींची नावे किंवा ओळख उघड केली जात नाही तर ती गोपनीय ठेवली जातात, मात्र या घटनेतील वृत्तांकन करताना माध्यमांनी हा नियम मोडीत काढत सर्रास पीडितेची ओळख उघड केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने ही कारवाई केली आहे.