कठोर परिश्रमांच्या बळावर ध्येय गाठणे सोपे

0

धुळे। प्रत्येक विद्यार्थ्याने स्वत:ची आवड, क्षमता ओळखली पाहिजे. शिवाय कठोर परिश्रमाच्या बळावर प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे. या बळावर कोणतेही ध्येय गाठणे कठीण होणार नाही, असे मत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे बीसीयूडीचे संचालक प्रा.डॉ.पी.पी. माहुलीकर यांनी व्यक्त केले. ’दहावी बारावीनंतर काय’ या विषयावर मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. शहरातील क्युमाईन क्लब येथे हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख बबन थोरात होते. या वेळी जिल्हाप्रमुख हिलाल माळी, हेमंत साळुंके, शिवआरोग्य सेनेच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. माधुरी बाफना, अ‍ॅड.पंकज गोरे, डॉ. सुशील महाजन, ऐश्वर्या अग्रवाल, नरेंद्र अहिरे आदी उपस्थित होते.

मुलांचे मनोबल ओळखून पालकांनी शिक्षण द्यावे
प्रा. डॉ. माहुलीकर म्हणाले, विद्यार्थ्यांनी खडतर परिश्रमाची तयारी ठेवली पाहिजे. दहावी बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर गोंधळून जाऊ नये. कोणत्या शाखेला अधिक स्कोप आहे याचा विचार केला पाहिजे. त्यासाठी वेळीच मार्गदर्शनही घ्यावे. मुलांचे मनोबल ओळखून पालकांनी योग्य ते शिक्षण द्यावे. स्पर्धेत टिकतांना स्वत:च्या क्षमता ओळखणे गरजेचे आहे. यशामुळे हुरळून जाऊ नये किंवा कमी गुण मिळाले म्हणून खचून जाऊ नये. परीक्षेतल्या मिळणार्‍या गुणावरून जीवनाच्या यशस्वितेचे मापदंड ठरवता येत नाही, असे सांगितले. यशस्वितेसाठी युवा सेनेचे अधिकारी अ‍ॅड. पंकज गोरे, ऐश्वर्या अग्रवाल, नीलेश चौधरी, सागर मोरे, स्वप्निल सोनवणे, दीपक देसले, भूषण चौधरी, विशाल शेटे, सागर गोरे यांनी कामकाज पाहिले.