कठोर मेहनत, शिस्त व जिद्द हीच यशाची त्रिसूत्री

0

जळगाव। स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना अपयश आले तरी खचुन न जाता सातत्याने परिश्रम करीत राहिल्यास यश नक्की असून कठोर मेहनत, शिस्त, व जिद्द हेच यशाचे त्रिसूत्र असल्याचे प्रतिपादन प्रज्ञाचक्षु आयपीएस अधिकारी प्रांजल पाटील यांनी केले. दीपस्तंभ फाऊंडेशनतर्फे नुकताच जाहीर झालेल्या युपीएससी परीक्षेत यशस्वी झालेल्यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. युपीएससीत मराठी टक्केवारी वाढत असून मराठी भाषेचा न्युनंगड न बाळगू नये. वैचारिक विकलांगता ही यशस्वी न होण्यामागील सर्वात मोठे कारण असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यांचा करण्यात आला सत्कार
नुकतेच केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाला जाहीर झाला. या परीक्षेत जिल्ह्यातील विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. परीक्षा उत्तीर्ण झालेले दीपस्तंभ फाऊंडेशनशी संबंधीत नसले तरी स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांना पे्ररणा मिळावी यासाठी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. यात प्रज्ञाचक्षु प्रांजल पाटील, महेश चौधरी, आशिष पाटील, सौरभ सोनवणे, अभ्युदय साळुंखे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खासदार ए.टी.पाटील, पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, माजी शिक्षणाधिकारी निळकंठ गायकवाड, दीपस्तंभचे संचालक यजुर्वेद्र महाजन, संचालक जयदीप पाटील यांची उपस्थिती होती. यशस्वी विद्यार्थ्यांच्या आईंच्या हस्ते कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करण्यात आले.

गरजुंना न्याय द्या
आपला समाज, देश हे आपले देणे लागते या भावनेने समाजसेवा करावी तसेच प्रशासकीय अधिकारी असल्याने प्रशासनाच्या दारी आलेल्या गरजुंना नेहमी न्याय देण्याचा प्रयत्न करा असा सल्ला राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी नुकतेच युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना दिला. अधिकारी व पदाधिकारी हे दोन्ही देशाच्या रथाचे दोन चाक असून दोघांच्या समन्वयाने देशाचा विकास शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी गुलाबराव पाटील यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.