कत्तलीच्या उद्देशाने होणारी गुरांची वाहतूक रोखली : 46 गुरांची सुटका
ट्रक चालकासह दोघांना अटक : गुरांची अवैध वाहतूक पुन्हा ऐरणीवर
रावेर : मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात कत्तलीच्या उद्देशाने होणारी गुरांची अवैध वाहतूक पाल पोलिसांनी रोखत 46 गुरांची सुटका केली तर या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. पोलिसांनी ट्रक जप्त करीत गुरांची जळगावच्या गो शाळेत रवानगी केली असून निदर्यतेने वाहतुकीमुळे आठ गुरांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे.
कत्तलीच्या उद्देशाने गुरांच्या वाहतुकीचा संशय
मध्यप्रदेशातुन महाराष्ट्रात गुरांची कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक होत असताना पाल पोलिसांनी शेरी नाकामार्गे ट्रक (क्रमांक एम.पी.17 एच.एच.1803) हा अडवल्यानंतर त्यात सुमारे 54 गुरांची दाटी-वाटीने वाहतूक होत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी 46 गुरांची सुटका करीत त्यांना जळगावच्या गो शाळेत हलवले तर आठ गुरांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. पाल पोलीस चौकीचे हवालदार राजेंद्र राठोड, कॉन्स्टेबल नरेंद्र बाविस्कर, कॉन्स्टेबल दीपक ठाकुर, पोलीस नाईक अतुल तडवी, कॉन्स्टेबल संदीप धनगर यांनी ही कारवाई केली. ट्रक चालक नसीम खान अकबर खान (27) व झुबेर खान रफीक खान (21, रा.करमेळी, जि.विदिशा, मध्यप्रदेश) यांना अटक करण्यात आली. ही कारवाई सोमवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास करण्यात आली.