सावद्याहून औरंगाबादकडे निघालेला आयशर ट्रक भुसावळात पकडला ; 10 म्हशींसह तीन रेड्यांची जळगावच्या आर.सी.बाफना ‘गो’ शाळेत रवानगी
भुसावळ- सावद्याहून औरंगाबादकडे विना परवाना गुरांची कत्तलीच्या इराद्याने वाहतूक करणारा आयशर ट्रक बाजारपेठ पोलिसांनी पकडून दहा म्हशींसह तीन रेड्यांची सुटका केल्याची घटना सोमवारी 12.45 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी बर्हाणपूरच्या चालकासह तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहनातील गुरांची जळगावच्या आर.सी.बाफना गो शाळेत रवानगी करण्यात आली असून अवैधरीत्या होणारी गुरांची वाहतूक पुन्हा चर्चेत आली आहे. पोलिसांनी कारवाईत सातत्य राखावे, अशी मागणी आता गो-प्रेमींमधून व्यक्त होत आहे.
पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांची कारवाई
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील नाहाटा चौफुलीजवळ बाजारपेठ पोलिसांचे पथक गस्त घालत असताना भरधाव वेगाने आशयर ट्रक (एम.एच.04 ई.वाय.9058) जात असल्याने पोलिसांचा संशय बळावल्याने त्यांनी वाहन थांबवून तपासणी केली असता त्यात दहा म्हशींसह तीन रेड्यांची वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले. संबंधिताकडे गुरांच्या वाहतुकीचा परवाना नसल्याने व अत्यंत निदर्यतेने गुरांची वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाल्याने चालकासह तीन संशयीतांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्तात्रय गुळींग, एएसआय तस्लीम पठाण, यासीन पिंजारी व जॉर्ज बाटली आदींनी केली.
बर्हाणपूरच्या तिघा आरोपींना अटक
अवैधरीत्या गुरांची वाहतूक केल्याप्रकरणी जितेंद्र ईश्वर पटेल (35, लोधीपुरा, हनुमानमंदिराजवळ, बर्हाणपूर), शेख शाकीर शेख बिसमिल्ला (32, बेरी मैदान ईमाम खान्याजवळ, बर्हाणपूर) व शेख रीजवान शेख इसाक (21, बेरीमैदान, वडाच्या झाडाजवळ, बर्हाणपूर) यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध एएसआय तस्लीम पठाण यांनी बाजारपेठ पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून प्राण्यांची निदर्यतेने वाहतूक कायदा 1960 क 11 (ड) (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार जयराम खोडपे करीत आहेत. सहा लाख रुपये किंमतीचा आयशर ट्रक व तीन लाख 70 हजार रुपये जनावरांची सुटका करून त्यांना जळगावच्या गो शाळेत रवाना करण्यात आले.