शिंदखेडा । पळासनेर येथून मालेगांव येथे कत्तलीसाठी नेण्यात येणार्या गुरांची गाडी शिरपूर येथील गोवंश रक्षा समितीचे कार्यकर्ते व मानद पशू कल्याण अधिकारी यांच्या सर्कतेमुळे पकडण्यात आली. याबाबत नरडाणा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गाडीसह अकरा गुरं असा दोन लाख अठ्ठयांशी हजाराचा माल ताब्यात घेण्यात आला आहे.
नरडाण्याजवळ पकडली गाडी
बुधवार, 25 रोजी रात्री उशिरा मीनी ट्रक (क्रमांक एम.एच. 19. बी.एम.1382) ने पळासनेर येथून मालेगांवकडे अवैध रित्या गुरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती शिरपूर येथील मानद पशू कल्याण अधिकारी जितेंद्र पाटील व गोवंश रक्षा समितीचे अध्यक्ष सुभाष मालू व कार्यकर्त्यांना मिळाली. त्यानुसार शिरपूर येथून त्यांनी या गाडीचा पाठलाग करून नरडाण्याजवळ गाडी पकडण्यात यश मिळवले. गाडी ड्रायव्हरकडे चौकशी केली असता योग्य उत्तर न मिळाल्याने गाडी गुरांसह नरडाणा पोलीस ठाण्यात नेण्यात आली. पोलिसांनी तपासणी केली असता 11 गायी मालेगांव येथे कत्तलीसाठी नेत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी दोन लाख रुपयांच्या गाडीसह अठ्ठयांशी हजाराची गुरे ताब्यात घेतली आहे. गुरांची अवैध वाहतूक करणारी गाडी पकडून देण्यामध्ये मानद पशू कल्याण अधिकारी जितेंद्र पाटील, शिरपूर गोवंश रक्षा समितीचे अध्यक्ष सुभाष मालू, पवन मराठे, अमोल पवार, विजू पवार यांची महत्वाची भूमिका होती.